news
Home पिंपरी चिंचवड मोशी दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना महापालिकेचा आर्थिक आधार; १० लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरू

मोशी दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना महापालिकेचा आर्थिक आधार; १० लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरू

कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला आदेश | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोशी कचरा डेपो दुर्घटना: मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीचे वाटप सुरू; मृत अक्षय सावंत यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात १० लाख रुपये जमा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत प्राण गमावलेल्या ९ नागरिकांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक दिलासा देण्यास सुरुवात झाली आहे. महापौर रवि लांडगे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत मृत अक्षय सावंत यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात १० लाख रुपयांची मदत जमा झाली असून, इतर मृतांच्या वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

मोशी दुर्घटनेतील मृत अक्षय सावंत (वय ३२) यांच्या कुटुंबीयांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, महापालिकेने तत्परतेने त्यांच्या बँक खात्यात एकूण १० लाख रुपयांची रक्कम हस्तांतरित केली आहे. पत्नी हर्षदा सावंत: एकूण मदतीपैकी ३४ टक्के रक्कम बँक खात्यात जमा, आई रेश्मा सावंत: एकूण मदतीपैकी ३३ टक्के रक्कम बँक खात्यात जमा, वडील राजू सावंत: एकूण मदतीपैकी ३३ टक्के रक्कम बँक खात्यात जमा. या मदतीचे वितरण कुटुंबातील सदस्यांमध्ये  करण्यात आले आहे. कुटुंबातील सर्व घटकांना कायदेशीर आणि योग्य आर्थिक आधार मिळावा या हेतूने हे समन्यायी वाटप थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

या दुर्घटनेतील इतर ८ मृत नागरिकांच्या वारसांनाही लवकरच ही मदत दिली जाणार आहे. त्यांच्या बँक खात्याची व कायदेशीर वारसदार असण्याची कागदपत्रे गोळा करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून जलद गतीने सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच १. भावेश वाणी (वय ३३), २. सुनील कोरके (वय ४०, रा. आळंदी), ३. सन्नी माने (वय ३९, रा. गंधर्वनगरी, मोशी), ४. महेश कुंभार (वय ३३, रा. छत्रपती संभाजीनगर), ५. नागेश गायकवाड (वय २६, रा. संजय गांधी नगर, मोशी), ६. रणजीत पाटील (वय २२, रा. मोशी), ७. राहुल गायकवाड (वय २३, रा. मोशी), ८. वामन कसबे (वय ५०, रा. मोशी)  मृत नागरिकांच्या कुटुंबीयांच्या खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये जमा केले जातील.

कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना महापौर रवि लांडगे म्हणाले:

“मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जलद गतीने सुरू असून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच ही मदत त्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. बाधित कुटुंबांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. याचबरोबर शहरातील सर्व वेस्ट मॅनेजमेंट (कचरा व्यवस्थापन) प्रकल्पांतील सुरक्षा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने राबविण्यात येत आहेत.”

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने कचरा डेपो परिसरातील सुरक्षा यंत्रणा आणि व्यवस्थापनामध्ये तातडीने कडक उपाययोजना लागू करण्यासही सुरुवात केली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!