पिंपरी, दि. १ मे २०२५: पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौकात गुरुवारी (दि. ३० एप्रिल) सकाळी एका रिक्षाचालकाने अक्षरशः गुंडगिरी केली. आपल्या रिक्षामधील एक प्रवासी पीएमपीएल बसमध्ये बसल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने थेट धावत्या बसला आडवे येत थांबवले आणि बस चालकाला लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना सकाळी १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास डांगे चौक येथील बीआरटी बस स्टॉपवर घडली. पीएमपीएल बस चालक राहुल कांबळे यांनी याप्रकरणी आरोपी सुनील बापु गायकवाड (वय ३५ वर्षे, धंदा-रिक्षा चालक, रा. चिंचवड) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी राहुल कांबळे यांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी सुनील गायकवाड याने त्याची रिक्षा त्यांच्या पीएमपीएल बसला आडवी लावली. बस थांबवताच तो खाली उतरला आणि चालकाला उद्देशून म्हणाला, “तुम्हा पीएमटी चालकांना खुप माज आला आहे. तुम्हाला मारल्याशिवाय समजणार नाही.” अशा शब्दांत धमकी देत त्याने शिवीगाळ सुरू केली आणि त्यानंतर लोखंडी रॉडने थेट राहुल कांबळे यांच्या कपाळावर वार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
या घटनेमुळे डांगे चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी रिक्षाचालक सुनील गायकवाड याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रवाशांवरून रिक्षाचालकाने पीएमपी बस चालकाला भरदिवसा मारहाण केल्याच्या या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
#पिंपरीचिंचवड #डांगेचौक #मारहाण #रिक्षाचालक #पीएमपीएल #गुंडगिरी #वाकडपोलीस #अटक #गुन्हा #सार्वजनिकवाहतूक
