पिंपरी-चिंचवड मनपाच्या पाचही विषय समित्यांवर सभापतींची वर्णी! सुजाता बोराटे, राणी पठारे यांच्यासह नव्या शिलेदारांची निवड; शहराच्या विकासाला मिळणार गती मॅक्स मंथन डेली न्यूज
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले (०२ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. पालिकेच्या पाच प्रमुख विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक आज शांततेत पार पडली. विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा आणि शिक्षण समितीवर नवीन सभापतींची निवड झाल्याने महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला आता खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
नवनिर्वाचित सभापतींची यादी
आज झालेल्या विशेष सभांमध्ये खालील नगरसेवकांची सभापतीपदी अधिकृत निवड जाहीर करण्यात आली:
| समितीचे नाव | नवनिर्वाचित सभापती |
| विधी समिती | सुजाता बोराटे |
| महिला व बालकल्याण समिती | राणी पठारे |
| शहर सुधारणा समिती | संजय नाना काटे |
| क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती | कैलास कुटे |
| शिक्षण समिती | रविना आंगोळकर |

निवडीनंतर पीठासीन अधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी नवनियुक्त सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या निवडीच्या वेळी विविध समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधी समितीच्या सभेला ज्ञानेश्वर जगताप, कुंदा भिसे, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप; महिला बालकल्याण सभेला पल्लवी जगताप, निता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, सुप्रिया चांदगुडे, निकिता कदम, सारिका मासूळकर; शहर सुधारणा सभेला अर्चना सस्ते, कुणाल वाव्हळकर, उत्तमराव केंदळे, अनंत कोऱ्हाळे; क्रीडा समिती सभेला शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, योगेश लांडगे, जितेंद्र ननवरे आणि शिक्षण समिती सभेला पल्लवी वाल्हेकर, कविता भोंगाळे, रिटा सानप, सारिका बोऱ्हाडे, प्रियांका कुदळे व योगिता बारणे उपस्थित होते.
नव्याने नियुक्त झालेल्या समित्यांच्या कामकाजाचे वार आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे:
-
विधी समिती: १ ला व ३ रा शुक्रवार (दुपारी ३:०० वा.)
-
महिला व बालकल्याण समिती: २ रा व ४ था गुरुवार (दुपारी २:३० वा.)
-
शहर सुधारणा समिती: २ रा व ४ था मंगळवार (दुपारी २:०० वा.)
-
क्रीडा, कला व संस्कृती समिती: २ रा व ४ था शुक्रवार (दुपारी २:३० वा.)
-
शिक्षण समिती: १ ला व ३ रा गुरुवार (दुपारी २:३० वा.)
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
