news
Home गुन्हेगारीआरोग्य वायसीएम रुग्णालयाचा निकालात दबदबा! एमडी/एमएस परीक्षेत विद्यार्थ्यांची बाजी!

वायसीएम रुग्णालयाचा निकालात दबदबा! एमडी/एमएस परीक्षेत विद्यार्थ्यांची बाजी!

डॉ. प्रीत शहा आणि डॉ. रवी केसवानी ठरले 'गोल्ड मेडलिस्ट'! आयुक्तांकडून कौतुक!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर एम.डी./एम.एस. परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेत डॉ. प्रीत शहा आणि डॉ. रवी केसवानी यांनी राज्यात अव्वल क्रमांक पटकावत ‘गोल्ड मेडलिस्ट’ होण्याचा मान मिळवला आहे.

सन २०२१ च्या पदव्युत्तर एम.डी./एम.एस. अभ्यासक्रमाच्या या परीक्षेत एकूण ३३ विद्यार्थ्यांपैकी २१ जण यशस्वी झाले आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला.

याप्रसंगी बोलताना आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व यशस्वी डॉक्टरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी शस्त्रक्रिया (सर्जरी), मेडिसिन आणि बालरोग या तीन विभागांतील उत्कृष्ट यशाबद्दल डॉक्टरांचे विशेष कौतुक केले. आयुक्त सिंह यांनी डॉक्टरांना रुग्णसेवा करताना सहानुभूती, मानवीय दृष्टीकोन आणि नैतिक मूल्यांना महत्त्व देण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला.

महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय परीक्षेत जनरल सर्जरी विभागात सहभागी झालेल्या सर्व ६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. या विभागात डॉ. प्रीत शहा यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून ‘गोल्ड मेडलिस्ट’चा मान पटकावला, तर डॉ. अजिंक्य आक्रे यांनी राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे.

जनरल मेडिसिन विभागात ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, डॉ. रवी केसवानी यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत गोल्ड मेडल आपल्या नावे केले आहे. बालरोग विभागात ४ विद्यार्थी यशस्वी झाले असून, डॉ. मेहेरीन मीर यांनी राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. यासोबतच, कान-नाक-घसा विभागात ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, डॉ. मनोज्ञा जाळवी यांनी राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी यशस्वी डॉक्टरांचे अभिनंदन केले आणि त्यांना पाठिंबा देणारे पालक तसेच मार्गदर्शन करणारे प्राध्यापक यांचे आभार मानले. त्यांनी डॉक्टरांना भावी आयुष्यात आरोग्यसेवेत कार्यरत असताना योग्य संवाद साधून यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देताना, कामामध्ये केवळ पैशाला महत्त्व न देता कामाच्या समाधानाला प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!