news
Home मावळमहाराष्ट्र बालविवाह थांबला! प्रशासनाच्या सतर्कतेमुळे १६ वर्षीय मुलीचे वाचले आयुष्य!

बालविवाह थांबला! प्रशासनाच्या सतर्कतेमुळे १६ वर्षीय मुलीचे वाचले आयुष्य!

अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये 'ॲसेस टु जस्टीस' टीम आणि ग्राम बाल संरक्षण समितीची यशस्वी कारवाई! Sources

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अकोला (मॅक्स मंथन डेली न्यूज)प्रतिनिधी विलास सावळे: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा होणारा बालविवाह वेळीच थांबवण्यात यश आले आहे. ‘ॲसेस टु जस्टीस’ प्रकल्प आणि ग्राम बाल संरक्षण समितीच्या सतर्कतेमुळे हे शक्य झाले.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात १६ मे २०२५ रोजी एका १६ वर्षीय मुलीचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील २५ वर्षीय व्यक्तीसोबत तिच्या घरी होणार होता. याची माहिती मिळताच, १५ मे २०२५ रोजी ग्राम बाल संरक्षण समिती आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तातडीने मुलीच्या घरी धाव घेतली. त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना समजावून सांगितले आणि त्यांच्याकडून मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचे लग्न न करण्याचे हमीपत्र लिहून घेतले.

तरीही शंका कायम असल्याने, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता गुरव, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्त्या राजश्री कीर्तीवार यांनी त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता पुन्हा मुलीच्या घरी भेट दिली. त्यावेळी लग्नाची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. पाहुणे जमले होते, हळदीचा कार्यक्रम सुरू होता आणि महिला बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमात व्यस्त होत्या. बालिकेला देण्यासाठी भेटवस्तू (आंदन) देखील आणले होते.

हे सर्व पाहून, तात्काळ मुलीचे आई-वडील आणि वऱ्हाडी मंडळी यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ विषयी माहिती देण्यात आली. तसेच, अल्पवयात लग्न झाल्यास मुलीवर होणारे शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करता येत नाही, हे स्पष्ट करण्यात आले आणि उपस्थितांचे समुपदेशन करण्यात आले. बालिकेला बाल कल्याण समिती, अकोला येथे हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली.

यानंतर, मुलगी आणि मुलाच्या आई-वडिलांसह सर्व नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळींना बाल कल्याण समिती, अकोला यांच्यासमोर सादर करण्यात आले. बाल कल्याण समितीने मुलीचे १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याबाबत मुलीच्या आणि मुलाच्या आई-वडिलांकडून हमीपत्र लिहून घेतले. यावेळी ग्राम सचिव आणि सरपंच यांची साक्ष घेण्यात आली.

हा बालविवाह थांबवण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. बाल कल्याण समिती अध्यक्षा अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, शिला तोषणीवाल, विनय दांदळे, ‘ॲसेस टु जस्टीस’ प्रकल्पाचे शंकर वाघमारे, सपना गजभिये, विशाल गजभिये, पूजा पवार, राजश्री कीर्तीवर, पूजा मनवर, ग्राम अधिकारी, सरपंच आणि ग्राम बाल संरक्षण समिती यांच्या योगदानाला यश आले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!