टेंभुर्णी (सोलापूर) [मॅक्स मंथन डेली न्यूज] प्रतिनिधी पंडित गवळी:- टेंभुर्णी आणि परिसरातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन केले होते. या उपक्रमामुळे टेंभुर्णी सर्कलच्या गावांतील नागरिकांना शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि विविध सेवा एकाच ठिकाणी तत्काळ उपलब्ध झाल्या.

या अभियानात आरोग्य विभागाने १६०० नागरिकांना सेवा दिली, तर ग्रामपंचायत विभागाने १५०, कृषी विभागाने ७० आणि महावितरणने ८५ सेवा पुरवल्या. यासोबतच, भूमी अभिलेख विभागाने ४८, उत्पन्न दाखले ३४५ आणि अधिवास दाखले १०८ नागरिकांना देण्यात आले. केवळ मनुष्यबळालाच नव्हे, तर १०० हून अधिक जनावरांनाही लसीकरण या अभियानात करण्यात आले.

या उपक्रमामुळे टेंभुर्णी पंचक्रोशीतील नागरिकांचे अनेक दिवसांपासून रखडलेले प्रश्न आणि शासकीय कामे जागेवरच मार्गी लागली. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी होणारी धावपळ थांबली आणि त्यांना मोठा फायदा झाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. भारत आबा शिंदे, श्री. भारत नाना पाटील, श्री. बाळासाहेब तात्या ढवळे, सरपंच सौ. सुरजाताई बोबडे, श्री. रावसाहेब नाना देशमुख, माजी सरपंच श्री. प्रमोद कुटे, चेअरमन श्री. औदुंबरभाऊ देशमुख, श्री. वैभव देशमुख, श्री. वैभव कुटे, श्री. विलास पाटील, श्री. विजय कोकाटे, श्री. पप्पू कदम यांच्यासह तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार श्री. भडकवाड साहेब, सर्कल ऑफिसर श्री. शेळवणे साहेब आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

