सिरसाळा (मॅक्स मंथन डेली न्यूज): “मुलींसाठी माहेरचा दरवाजा कायम उघडा ठेवा!” – ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचे भावनिक आवाहन! अहिल्यादेवी होळकर त्रिजन्म शताब्दी कीर्तन महोत्सवाची समारोप.
स्त्रियांना संधी आणि स्वातंत्र्य मिळाल्यास त्या निश्चितच आपले सामर्थ्य दाखवतात. त्यामुळे मुलींच्या लग्नाची घाई न करता, त्यांना शिक्षण आणि करिअरमध्ये पुढे वाढू द्या. त्या नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी व्यक्त केला. वैष्णवी हागवणेसारख्या घटना टाळण्यासाठी ‘मुलगी परक्याचे धन’ ही मानसिकता सोडा आणि मुलींसाठी माहेरचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी सिरसाळा येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त सिरसाळा येथे आयोजित कीर्तन महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. हरिश्चंद्र वंगे, प्रभाकर वाघमोडे, माऊली गडदे, ॲड. अजय बुरांडे आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते बंडू खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सतीश काळे यांनी आभार मानले.
महाराज सोन्नर पुढे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी कार्य केले आणि एका आदर्श राज्याची शिकवण दिली. मात्र, त्यांच्या जयंतीला डीजे लावून गैरकृत्ये करणे दुर्दैवी आहे. त्यांनी डीजेमुक्त जयंतीचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
डॉ. वंगे म्हणाले की, महापुरुषांची जयंती त्यांच्या समाजातील लोक साजरे करतात, पण सिरसाळ्यात सर्वधर्मीयांना एकत्र आणून हा सोहळा आयोजित करणे महत्त्वाचे आहे. तरुणाईला डीजे आणि व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी कीर्तन महोत्सवाचा पर्याय देणे खूप महत्त्वाचे आहे, असे माऊली गडदे यांनी सांगितले.
कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
वारकरी रिंगण आणि मोटारसायकल रॅली:
अहिल्यादेवी होळकर त्रिजन्म शताब्दी महोत्सवाच्या समारोपाला सिरसाळा येथे मोटारसायकल रॅली आणि दिंडी काढण्यात आली. दिंडीतील वारकरी रिंगणाने सर्वांचे लक्ष वेधले, ज्यात कार्यकर्त्यांनी पारंपरिक नृत्यावर ताल धरला आणि डीजेपेक्षा हा आनंद खूप मोठा असल्याचे मत व्यक्त केले.