अकोला (मॅक्स मंथन डेली न्यूज): तीन जागरूक महिलांच्या मदतीने हरवलेली मुलगी कुटुंबाला सुखरूप परत मिळाली. बाल कल्याण समिती, अकोला आणि ॲसेस टू जस्टीस प्रकल्पाच्या प्रयत्नांना यश आले.
अकोला बस स्थानक परिसरात रात्री नऊच्या सुमारास १७ वर्षीय मुलगी एकटीच भटकताना काही महिलांना दिसली. त्यांनी तिला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला आणले. घटनेची माहिती मिळताच बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता शिंदे यांच्या निर्देशानुसार, ॲसेस टु जस्टीस प्रकल्पाचे शंकर वाघमारे, सपना गजभिये आणि राजश्री किर्तीवार यांनी पोलीस स्टेशन गाठून मुलीशी संवाद साधला.
मुलीने सांगितले की, ती आई-वडिलांसोबत एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती. रिसोडहून मुंबईला जाण्यासाठी ते अकोला बस स्थानकावर उतरले. अकोला रेल्वे स्टेशनवरून त्यांना मुंबईला जायचे होते. बस स्थानकावर पाणी पिण्यासाठी गेल्यावर मुलगी आणि तिचे आई-वडील वेगळे झाले. मुलगी त्यांना शोधत असताना तेथील महिलांनी तिला विचारले आणि पोलीस स्टेशनला आणले.
पोलिसांनी घटनेची नोंद करून मुलीच्या पालकांचा शोध सुरू केला. तात्पुरत्या निवाऱ्यासाठी मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार गायत्री बालिकाश्रम, मलकापूर येथे पाठवण्यात आले. अथक प्रयत्नानंतर मुलीच्या आईशी संपर्क साधण्यात आला आणि तिला मुलगी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली.
मुलीचे आई-वडील आणि नातेवाईक तिला घेण्यासाठी अकोला बालकल्याण समिती कार्यालयात आले. त्यांनी सांगितले की, ते मालेगाव येथे एका लग्नासाठी आले होते आणि मुंबईला जात असताना अकोला येथे त्यांची आणि मुलीची ताटातूट झाली. ओळख पटल्यानंतर मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.
अकोल्यातील तीन महिलांच्या सतर्कतेमुळे मुलगी आपल्या कुटुंबाकडे सुखरूप पोहोचली. या कार्यवाहीत बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, शिला तोषणीवाल, विनय दांदळे, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन आणि ॲसेस टु जस्टीस प्रकल्पाच्या शंकर वाघमारे, सपना गजभिये व राजश्री किर्तीवर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
