पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन ब्रेकिंग न्यूज): चऱ्होली TP Scheme अखेर रद्द! भूमिपुत्रांचा विजय, आमदार लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme (टाऊन प्लॅनिंग योजना) अखेर रद्द करण्याची घोषणा केली आहे. प्रशासनाने आज ही घोषणा केली असून, आगामी सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी देऊन अधिकृत ‘नोटिफिकेशन’ काढण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांच्या एकजुटीचा विजय झाला असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
शहरीकरणाच्या नावाखाली अन्याय?
पिंपरी-चिंचवड शहराच्या झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून चऱ्होली TP Scheme चा मुद्दा चर्चेत होता. महानगरपालिका प्रशासनाने मौजे चिखली आणि चऱ्होलीसह अनेक गावांमध्ये TP Scheme लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, स्थानिक शेतकरी आणि नागरिकांशी योग्य चर्चा न करता ही योजना राबवण्याचा प्रयत्न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. शेतकरी आणि भूमिपुत्र शहरीकरणाच्या नावाखाली भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत होते. याआधीही MIDC, नवनगर विकास प्राधिकरण आणि महानगरपालिका हद्दवाढीच्या वेळी अनेक जमिनी आरक्षणाखाली गेल्याचा अनुभव असल्याने त्यांची भीती अधिक वाढली होती.
आमदार महेश लांडगे यांचा निर्णायक विरोध
भाजपा आमदार महेश लांडगे यांनी भूमिपुत्रांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत तीन बैठका घेऊन आपला तीव्र विरोध दर्शवला. “शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) तयार होत असताना, TP Scheme चा आग्रह का?” असा थेट प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला. त्यांच्या या पाठपुराव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाठिंबा दिला. स्थानिक ग्रामस्थ, माजी महापौर नितीन काळजे आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
‘चऱ्होली बंद’चा दबाव आणि प्रशासनाचा नमतेपणा
30 मे रोजी ‘चऱ्होली बंद’ची हाक देण्यात आली होती. त्यानंतर ग्रामस्थांची एकत्रित बैठक झाली आणि आंदोलन अधिक तीव्र झाले. यामुळे महापालिका प्रशासनाने मौजे चऱ्होलीच्या TP Scheme वर स्थगितीची घोषणा केली. आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले, “भूमिपुत्रांच्या भावना आणि आमदार लांडगे यांच्या विरोधाचा सन्मान करून आम्ही ही प्रक्रिया थांबवत आहोत. लवकरच ही Scheme रद्द करण्याचे प्रस्ताव सादर केले जातील.”
आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया
“पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्र हा माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू आहे. चिखली आणि चऱ्होली – दोन्ही गावांच्या TP योजना रद्द होणे, हे भूमिपुत्रांच्या लढ्याचं फलित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात पाठिंबा दिला. शास्तीकर माफी, प्राधिकरण परतावा, बफर झोन रद्दीकरण यांसारखे निर्णयही सरकारने घेतले. मी पुढेही भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढा देत राहीन.” – आमदार महेश लांडगे, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
भूमिपुत्रांच्या या विजयाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की कळवा!