संत तुकाराम नगरमध्ये ‘पुनर्विकासाचा महासंकल्प’: ९४१ सदनिकाधारकांची भव्य सर्वसाधारण सभा संपन्न!
जीर्ण वसाहतीचे नवे स्वप्न: ३५० ऐवजी ९०० ते १२०० चौ. फुटांच्या घरांसाठी एकजुटीने प्रयत्न सुरू!
पिंपरी, १७ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी येथील संत तुकाराम नगर (पिंपरी पुणे १८) येथे काल (सोमवार, १६ जून) ९४१ सदनिकाधारक कुटुंबांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी एक भव्य सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेने संत तुकाराम नगरमधील जीर्ण झालेल्या वसाहतीला नवसंजीवनी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, जिथे रहिवाशी मोठ्या घरांच्या स्वप्नासाठी एकवटले आहेत.
कामगार नेते यशवंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचा ठराव!
दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात झाल्यानंतर, येथील सुप्रसिद्ध कामगार नेते यशवंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सोसायटीच्या मान्यवर सभासदांना पुढील वाटचालीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सोसायटीचे सरचिटणीस शंकरराव शितोळे, उपाध्यक्ष ओमकार जोकारे, कार्याध्यक्ष अंकुश वाघमारे, आणि सुधाकरराव शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. श्री. मनोज नांदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सौ. मानसी देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी सहकार्याध्यक्ष श्री. दत्तात्रय घाडगे, सहचिटणीस सतीश सासवडे यांच्यासह अप्पू कुट्टण नायर, इस्मत सुलताना सय्यद, शिरीष सासवडे, विनायक निकम, राजेंद्र पाटील, योगेंद्र आरवडे, चंद्रकांत पडवळ, फौजदार गायकवाड, सुदाम गायकवाड, आप्पासाहेब माने, शहनाज ताई मौलवी, राजाराम भोंडवे, अंकुश गायकवाड, शालन महापुरे, किसन भाग्यवंत, अरुणाताई भंडारी, आरतीताई पराळे, योगेश रेळेकर, दत्ता झरकर, लताताई पाटील, मल्लेश कोरवी इत्यादी कार्यकारणी सदस्य मंचावर उपस्थित होते. कार्यालयीन सचिव अमोलजी घोरपडे, सोमनाथ विरकर, सोनाली विरकर, राजेंद्र आरणकल्ले, अर्श शेख जहागीरदार यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
म्हाडाच्या ३५० चौ.फुटाऐवजी ९०० ते १२०० चौ. फुटांचे स्वप्न!
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाने (म्हाडा) १९८५ साली वसवलेली ही वसाहत आता अतिशय जीर्ण झाली आहे. १९८६ पासून इथे वास्तव्यास असलेले रहिवाशी सांगतात की, दुमजली असलेल्या ९४१ सदनिकांची अवस्था बिकट झाली आहे. घरांच्या विविध प्रश्नांसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झाली, तर न्यायालयीन प्रक्रियेतून घरांच्या किमती कायम करून घेण्यात संत तुकाराम नगरने सदैव पाठिंबा दिला होता.
म्हाडा नियमानुसार पुनर्विकासात केवळ ३५० चौरस फुटांचे घर मिळणार असताना, नवीन शासनाच्या धोरणानुसार रहिवाशांनी सोसायटी स्थापन करून म्हाडासोबत कन्व्हेन्स डीड (हस्तांतरण) केल्यास आणि नवीन विकसकासोबत करार केल्यास, सध्या २८० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना तब्बल ९०० चौरस फूट ते १२०० चौरस फुटांपर्यंत मोठे घर मिळू शकेल. यासाठी सर्व रहिवाशी एकजुटीने प्रयत्न करत आहेत.
श्रमिकांच्या स्वप्नपूर्तीकडे सामुदायिक वाटचाल: ‘कन्व्हेन्स डीड’ प्रक्रिया वेगात!
संत तुकाराम नगरमध्ये मुख्यतः श्रमिक वर्ग राहत असून, त्यांचे हे मोठे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजूट केली आहे. ‘कन्व्हेन्स डीड’ची प्रक्रिया देखील सुरू झाली असून, त्यासाठी ‘संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना’ नावाने माननीय उपनिबंधक यांच्याकडे सहकारी संस्था नोंदणीकृत केली आहे. भुईभाडे, कन्व्हेन्स डीड मुद्रांक शुल्क यांसारख्या बाबींची पूर्तता रहिवाशी झपाट्याने करत आहेत. लवकरच या सर्व श्रमिकांचे आणि मध्यमवर्गीयांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ही सामुदायिक वाटचाल सुरू आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.