news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home अकोला मूर्तिजापूर तालुक्यात ‘साखरा पॅटर्न’ची शैक्षणिक क्रांती: शेलू बोंडे येथे कॉन्व्हेंट सुरू, ग्रामीण शिक्षणाला नवसंजीवनी!

मूर्तिजापूर तालुक्यात ‘साखरा पॅटर्न’ची शैक्षणिक क्रांती: शेलू बोंडे येथे कॉन्व्हेंट सुरू, ग्रामीण शिक्षणाला नवसंजीवनी!

'प्रभात किड्स'च्या सहकार्याने दर्जेदार शिक्षणाची समान संधी; डॉ. गजानन नारे यांचा विश्वास, जिल्हा परिषद शाळांना बळकटी देण्याचा प्रयत्न. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शेलू बोंडे येथे ‘साखरा स्कूल पॅटर्न कॉन्व्हेंट’चे थाटात उद्घाटन: ग्रामीण शिक्षणात क्रांतीचा नवा अध्याय!

 

 

डॉ. गजानन नारे यांच्या हस्ते उद्घाटन; ‘प्रभात किड्स’चे दर्जेदार अभ्यासक्रम व प्रशिक्षण उपलब्ध होणार, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी अभिनव उपक्रम!

 

मूर्तिजापूर, दि. ४ जुलै २०२५: ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावून जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू बोंडे येथे ‘साखरा स्कूल पॅटर्न कॉन्व्हेंट’ चे थाटात उद्घाटन झाले. यावर्षी खाजगी शाळा गटातून ५१ लाखांचे सर्वोत्कृष्ट शाळेचे प्रथम बक्षीस मिळवणाऱ्या प्रभात किड्स, अकोला या संस्थेचे संस्थापक डॉ. गजाननराव नारे यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी गावच्या सरपंच डॉ. शुभांगी बोंडे अध्यक्षस्थानी होत्या, तर सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. तुषार बायसकार आणि प्रगती शेतकरी मंडळाचे राजूभाऊ वानखडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


 

‘साखरा पॅटर्न’चा अभ्यास आणि अंमलबजावणी

वाशिम जिल्ह्यातील साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेने मागील वर्षी ५१ लाखांचे सर्वोत्कृष्ट शाळेचे प्रथम बक्षीस मिळवून आपला शैक्षणिक उपक्रम महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ठरवला आहे. खेड्यातून शहरांकडे शिक्षणासाठी होणारा ओघ कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार हे जाणून, जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, मूर्तिजापूर आणि शेलू बोंडे येथील शाळा समिती व सरपंच यांनी आवर्जून साखरा येथे जाऊन या ‘साखरा पॅटर्न’चा सखोल अभ्यास केला. त्यांच्याप्रमाणेच शैक्षणिक उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळा, शेलू बोंडेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शाळा समिती व ग्रामपंचायतीने नर्सरी व के.जी. वन शिक्षणासाठी ‘साखरा स्कूल पॅटर्न कॉन्व्हेंट’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.


 

‘निश्चित यशस्वी होईल’ – डॉ. गजाननराव नारे यांचा विश्वास

 

डॉ. गजाननराव नारे यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, साखरा येथे हजारो लोकांनी भेट दिली असली तरी, त्यांच्यासारखा उपक्रम स्वतःच्या गावात सुरू करणारे तालुक्यात शेलू बोंडे हे पहिले गाव ठरले आहे. हा उपक्रम निश्चित यशस्वी होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच, या शैक्षणिक उपक्रमाला माझे पूर्ण सहकार्य राहील आणि दर्जेदार अभ्यासक्रमही ‘प्रभात किड्स’चा असेल. सोबतच, नेमलेल्या शिक्षकांना प्रशिक्षणही आम्ही देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


 

दर्जेदार शिक्षणाची समान संधी

डॉ. तुषार बायस्कार यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सांगितले की, शिक्षक शाळेचा आत्मा आहे आणि शाळा मोठी होण्यासाठी गावातील जबाबदार नागरिकांनी शाळेला चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी मदत केली पाहिजे. दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळावी, आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांच्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, शिस्त लावून अभ्यासात गोडी निर्माण व्हावी याच उद्देशाने या ‘साखरा स्कूल पॅटर्न कॉन्व्हेंट’ ची निर्मिती केली आहे. हा पॅटर्न सेलू बोंडे येथेही यशस्वी होऊन चांगले विद्यार्थी घडवून त्यांना मोठ्या पदापर्यंत पोहोचवेल, त्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत व आज्ञाधारकपणा अंगीकारणे आवश्यक आहे. फावल्या वेळेत खेळा किंवा वाचन करा, वाचनामुळे तुम्हाला निश्चित यश मिळेल असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.


 

शेतकरी मंडळाचे कौतुक

 

प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी बोलताना, पीडित शेतकरी वर्गाकडे मोठ्या शाळेची भरमसाठ फी भरण्यासाठी व इतर खर्चासाठी पैसे नसल्यामुळे ही शाळा सुरू करून दर्जेदार शिक्षणाची सोय करून दिल्याबद्दल येथील सर्व लोकांचे, शाळा समितीचे, ग्रामपंचायतचे आभार मानले. ही शाळा आदर्श होईल यात शंका नसल्याचे मत त्यांनी मांडले.


 

कार्यक्रमाचे विशेष क्षण

 

सर्वप्रथम शाळेच्या लेझीम पथकाने मान्यवरांना मानवंदना देऊन मुख्य रस्त्यापासून उदघाटन स्थळापर्यंत पोहोचवले. स्वागत गीतावर विद्यार्थिनींनी अप्रतिम नृत्य आविष्कार सादर करून पाहुणे व उपस्थितांची मने जिंकली. पाहुण्यांच्या स्वागतासोबतच, कॉन्व्हेंटच्या शिक्षिका आणि ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना या कॉन्व्हेंटमध्ये दाखल केले, त्या पालकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

जनमंचचे अध्यक्ष प्रा. सुधाकर गौरखेडे यांनी शेतकरी मंडळाच्या विविध उपक्रमांबद्दल आणि शेलू बोंडेची जि.प. शाळा भविष्यात बंद पडू नये यासाठी कॉन्व्हेंट सुरू करण्याची कशी आवश्यकता आहे, याविषयीची मुद्देसूद माहिती आपल्या प्रास्ताविकातून विषद केली. कार्यक्रमाचे बहारदार संचलन वसू सर यांनी केले, तर आंतरभारती पुणेचे तालुका सचिव प्रमोद राजंदेकर यांनी आभार मानले. प्रसिद्ध कवी माधव काळे यांनी गायलेल्या राष्ट्रवंदनेने उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाला शेलू बोंडे, लाईत या परिसरातील पालक, पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेतकरी मंडळ, शाळा शिक्षण समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व शिक्षकांनी अविरत मेहनत घेतली. जनमंच नागपूरसह सर्व स्तरातून कॉन्व्हेंटला चांगले सहकार्य लाभले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!