डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये ‘सण अग्रिम’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दिनांक: ५ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. या जयंती उत्सवासाठी महापालिका आस्थापनेवरील पात्र कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये ‘सण अग्रिम’ (Festival Advance) देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचे अधिकृत आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.
सहाव्या वेतन आयोगानुसार ज्यांचे ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा कमी आहे किंवा सातव्या वेतन आयोगानुसार ज्यांची पे-लेव्हल एस-१७ (वेतन संरचना ४७,६०० – १,५१,१००) पेक्षा कमी आहे, अशा सर्व पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सण अग्रिमचा लाभ घेता येणार आहे. ही रक्कम ऐच्छिक स्वरूपात दिली जाणार आहे.
सण अग्रिम म्हणून मिळणारी १५ हजार रुपयांची ही रक्कम एकरकमी दिली जाईल. मात्र, या रकमेची परतफेड संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मे २०२६ पासून दरमहा १५०० रुपयांप्रमाणे एकूण १० हप्त्यांमध्ये केली जाणार आहे. ही रक्कम १४ एप्रिल २०२६ पूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समिती आणि महापालिका सभेने यापूर्वीच मंजूर केला होता. त्यानुसार हा निर्णय अमलात आणला जात आहे.
“भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी आहेत. महापालिका दरवर्षी ही जयंती उत्साहात साजरी करते. जयंतीनिमित्त सण अग्रिम देऊन कर्मचाऱ्यांचा या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश आजही आपल्याला दिशा देणारा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांना सण अग्रिम देणे, हा त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न आहे.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.







