एमआयटी-ॲडमिशन सजेशन आयोजित करिअर सेमिनार संपन्न! ‘वेळेचं नियोजन करा आणि आवडीच्या दिशेने वाटचाल करा’ – तज्ञांचा विद्यार्थ्यांना सल्ला
पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांचा ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान; बारावी नंतरच्या संधींवर मोलाचं मार्गदर्शन
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १३ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज::
पिंपरी-चिंचवड, ता. १२: एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘बारावी नंतर पुढे काय?’ या विषयावर मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरातील तज्ज्ञ शिक्षकांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे सहाय्यक संचालक डॉ. उल्हास माळवदे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकिशोर कार्लेकर आणि ॲडमिशन सजेशनचे संचालक अक्षय कुमार भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. उल्हास माळवदे यांनी विद्यार्थ्यांना बारावी नंतर उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. त्यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठातील प्रवेशाचे निकष समजावून सांगितले. “विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करून नावलौकिक मिळवावा. वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास चांगले गुण मिळतील. अभ्यास करताना रिव्हिजन (Revision) सुरू ठेवा. टॉपर विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत पाहा.” त्यांनी बारावी नंतरचे अभ्यासक्रम, योग्य महाविद्यालयाची निवड आणि प्रवेश परीक्षे (Entrance Exam) संदर्भात सोप्या स्टेप्समध्ये मार्गदर्शन केले.

डॉ. नंदकिशोर कार्लेकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरचा मार्ग निवडताना आवड आणि भविष्याचा वेध घेण्याचा सल्ला दिला. “तुम्ही मशीन कसे शिकतात, डेटा निर्णय कसा बदलतो किंवा मोबाइल अॅप्स लोकांचे जीवन कसे सुलभ करतात, या गोष्टींची आवड असेल तर तीच दिशा निवडा आणि स्पेशलायझेशन करा.” प्रगत तंत्रज्ञान (Advanced Technology) शिकण्यापूर्वी गणित, भौतिकशास्त्र आणि कोअर प्रोग्रॅमिंग (Core Programming) या विषयांमध्ये तुमचा पाया मजबूत असावा. “आज तुम्ही जे तंत्रज्ञान शिकत आहात (AI, Edge Computing, Blockchain) ते पुढील दशकात जगाच्या मूलभूत प्रणालीचा भाग होणार आहे. त्यामुळे तुमचा करिअर फक्त २०२५ साठी नव्हे, तर भविष्यासाठी घडवा आणि सतत शिकत राहा.”
अक्षयकुमार भंडारी यांनी विद्यार्थ्यांना सीईटी (CET) आणि जेईई (JEE) अभ्यासक्रमाबद्दल संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली. त्यांनी इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासंदर्भात माहिती देत, “कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आणि ते कसे निवडायचे? यावर लक्ष केंद्रित केले. कौन्सिलिंग म्हणजे फक्त फॉर्म भरणे नाही, तर योग्य महाविद्यालयाची निवड करणे हे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील खालील तज्ज्ञ शिक्षकांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. विजय बोबडे सर (चाटे कोचिंग क्लास, चिंचवड), फुंदे मॅडम (ओम फिनिक्स कोचिंग क्लासेसच्या संचालिका), सावंत डीजे (चाटे कोचिंग क्लासचे संचालक, निगडी-रावेत), वाळुंज सर (ओमकार मॅथ अकॅडमी संचालक), प्रा. सचिन निंजवते (चाटे कोचिंग क्लासेस, थेरगाव), घोंगडे सर (ओम फिनिक्स कोचिंग क्लासेस, साने चौक), नितेश शिरसाठ (ओम फिनिक्स कोचिंग क्लास, निगडी) यांचा गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमराज नाडे यांनी केले, तर आभार अक्षय भंडारी यांनी व्यक्त केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
