PCMC निवडणुकीत ‘स्वबळ’ की ‘युती’? निर्णय स्थानिक कोअर कमिटीवर – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती
बूथवर ५१% मतांची लढाई जिंकण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन; ‘देशहित’ हाच भाजपचा अजेंडा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २३ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) आगामी निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाने (BJP) आज (शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५) मोठे आणि निर्णायक विधान केले आहे. आगामी मनपा निवडणूक भाजपने एकट्याने लढायची की युती करून, याचा निर्णय स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून शहर भाजपची कोअर कमिटी घेईल, आणि त्यानंतरच वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मोठे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्याला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड निवडणूक संचालन समितीचे संयोजक आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघठन सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, वैशाली खाडेय, मधुकर बच्चे यांच्यासह माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, उषा ढोरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, पक्षाचे सर्व नगरसेवक-नगरसेविका, हजारो पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याचवेळी बजरंग दलाचे पुणे विभाग संयोजक कुणाल साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (राकांपा) माजी नगरसेवक अरुण टाक, श्रीमती आशाताई सोदाई, मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत राऊत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते जगदीश येवले, प्रभाग क्रमांक १७ चिंचवडे नगर येथील धनंजय आंबुसकर, संत तुकाराम नगर प्रभागातील डॉ. संदीप बागडे, प्रभाग क्रमांक १४ संतोष चौगुले, पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध उद्योजक संदीप काटे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, कायदा आघाडी, शहरातील सर्व मंडले व विविध आघाडीच्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी भाजपची वैचारिक भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “भाजपचे कार्यकर्ते वैचारिक भूमिका घट्ट धरून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची ओळख जगभर पोहोचली आहे. फक्त भाजप हाच पक्ष देशाच्या हिताचा विचार करणारा अजेंडा घेऊन चालतो. बाकीच्या प्रादेशिक पक्षांचा अजेंडा हा कुटुंबावर आधारित असतो. आपला अजेंडा देश आणि देशाच्या फायद्यासाठी आहे.”
त्यांनी कार्यकर्त्यांना ‘बूथ’वर ५१ टक्के मतांची लढाई लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. तसेच, ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ चा मंत्र प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यास सांगितले.
-
प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी शहरात भाजपला मिळालेल्या मोठ्या ताकदीचा उल्लेख करत, मनपा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर होईल, असा विश्वास व्यक्त केला. यासाठी मतदारांपर्यंत पोहोचून पदवीधर मतदार नोंदणी वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
-
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीही ‘शंभर पार’ चा नारा दिला आणि महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा संकल्प सोडला. तसेच, शहराच्या विकासासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी केले तर सूत्रसंचालन संगठन सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
