पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उत्साहात साजरा; गरजू व्यक्तींना तीनचाकी ई-वाहनांचे वितरण, दिव्यांग कलाकारांकडून कलाविष्कार सादर
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ४ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिव्यांग नागरिकांना सबलीकरण, स्वावलंबन आणि सन्मानाची वागणूक देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी सांगितले की, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, शिक्षण-सुविधा आणि पथदर्शी कल्पनांमुळे दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत आहे. महापालिका दिव्यांग बांधवांसाठी सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात माहिती दिली की, पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग कल्याणासाठी २०२४-२५ मध्ये तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी खर्च करत असून, १० हजार ६०१ लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत देण्यात येते.
-
पथदर्शी योजना: दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी तीन चाकी ई-वाहनावरील फिरते दुकाने, महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग भवन, घरपोच सर्वेक्षण आणि लवकर निदान-उपचार अशा पथदर्शी योजना राबविण्यात येत आहेत.
-
सहकार्य: शहरात कार्यरत असलेल्या दिव्यांग संघटनांचे सातत्यपूर्ण सहकार्य प्रशासनाला लाभत असून, यामुळे या योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.
यावेळी दिव्यांग नागरिकांना तीनचाकी ई-वाहनांचे वितरण करण्यात आले.
दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख (माजी आयएएस) यांनी फाऊंडेशनच्या गतवर्षीतील कार्याचा आढावा घेतला. फाऊंडेशनच्या वतीने कौशल्यविकास प्रशिक्षण, रोजगार मार्गदर्शन, स्वावलंबन शिबिरे, आरोग्य तपासणी, कृत्रिम अवयव वाटप व फिजिओथेरपी शिबिरे यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. तसेच यू.डी.आय.डी. नोंदणी, आधार-रेशन कार्ड दुरुस्ती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विशेष केंद्रे उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी “दिव्यांग बांधवांनी मागणारे नव्हे, तर देणारे होण्याची भावना जोपासावी,” असे आवाहन केले. तसेच शहरातील दिव्यांग भवन हे आमचे तीर्थक्षेत्र असून, त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुपारच्या सत्रात दिव्यांग कलाकारांनी नृत्य, गायन आणि संगीत वादनाचे मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने सादर केलेल्या कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि विशेष प्राविण्य प्राप्त दिव्यांग नागरिक व विद्यार्थी यांचा देखील सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्तींचा सन्मान:
पारस पाटील, ऋषी म्हलोत्रा, विकास जगताप, नूतन रेहमाने, जयश्री दौंडकर, रीना पाटील, अशोक भोर, पांडुरंग साळुंखे, प्रियंका कटारिया, स्वपनिल अदमाने, ओम साठे, शीतल लेंभे, अमित तारे, अजित कवी, संतोष नवसुपे, सुनील वाघ, वैशाली शिंदे, राजू विटकर, रामू जाधव, धीरज नागे, प्रशांत नागे, वैशाली पवार, निशा गुप्ता, शंकर सोळसे, प्रीतम शिंदे, संकेत खरे, अदनाम अब्दुल्ला, द्विज भोसले, प्रणव जायभाये, ऋषीराज गायकवाड, शिव अहिरे, श्लोक येव्हरे, अगत्य बानकर, गौरव घुतुकडे, आरुष नागरे, प्रथमेश पारवे, यश भालेराव, नामदेव गरुड, पावन मुंढे, ज्ञानदेव खाडे, संतोष शिंदे, स्नेहल लहाने, श्रावणी शिंदे, रेहान साळवे यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच, संस्थांमध्ये आदित्य दीक्षित (अल्फा लावल), वैभव जोशी (बीएमसी सॉफ्टवेअर), विवेक जोशी (डब्ल्यू टीई इंडिया), सुमेध लव्हाळे (स्पार्क मिंडा), लखन शिंदे (बिग बास्केट) यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान रोजगार नोंदणी, यू.डी.आय.डी. कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड दुरुस्ती केंद्र उभारण्यात आले होते, जिथे नागरिकांनी मोठी गर्दी केली.
| केंद्र | नोंदणी आकडेवारी |
| आधार कार्ड | २५ |
| संजय गांधी निराधार | ५० |
| रेशन कार्ड | १३० |
| यू डी आय डी कार्ड | १५० |
| समाज विकास | १०० |
| दिव्यांग भवन भरती व स्वयंरोजगार | ९५ |
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर निवेदिता घार्गे यांनी आभार व्यक्त केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


