अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध!
यादीवर दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३ ते १८ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत; पात्र-अपात्र मतदारांची आकडेवारी जाहीर
अमरावती,प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ४ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघांसाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी (De-nova Electoral Roll) तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी बुधवार, ३ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यादीची प्रत विभागीय, जिल्हा, उपविभागीय व तहसील स्तरावर उपलब्ध करण्यात आली असून, ज्या पात्र शिक्षकांचे नाव अद्याप नोंदणीकृत झालेले नाही, त्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे, असे अपर आयुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मतदार नोंदणी अधिनियम, १९६० नुसार या पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
| टप्पा | दिनांक | तपशील |
| प्रारूप यादी प्रसिध्दी | ३ डिसेंबर २०२५ | प्रारूप मतदार याद्यांची बुधवारी प्रसिध्दी. |
| दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी | ३ ते १८ डिसेंबर २०२५ | मतदार नोंदणी अधिनियम, १९६० चे कलम १२ अंतर्गत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. |
| दावे व हरकती निकाली काढणे | ५ जानेवारी २०२६ | या दिवशी पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येणार आहे. |
| अंतिम मतदार यादी प्रसिध्दी | १२ जानेवारी २०२६ | अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल. |
दिनांक १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभाग शिक्षक मतदार नोंदणीसाठी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान अर्ज स्वीकृत करण्यात आले होते. या अर्जांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:
| अ.क्रं. | जिल्ह्यांचे नाव | एकूण प्राप्त अर्ज संख्या | पात्र मतदार संख्या | अपात्र मतदार संख्या |
| १ | अमरावती | ८२४८ (पुरुष: ५१६०, स्त्री: ३०८८) | ८१०४ (पुरुष: ५०८६, स्त्री: ३०१८) | १४४ (पुरुष: ७४, स्त्री: ७०) |
| २ | अकोला | ४९५५ (पुरुष: ३३७४, स्त्री: १५८०, इतर: १) | ४८८३ (पुरुष: ३३३२, स्त्री: १५५०, इतर: १) | ७२ (पुरुष: ४२, स्त्री: ३०) |
| ३ | यवतमाळ | ५८२९ (पुरुष: ४२६६, स्त्री: १५६२, इतर: १) | ५७१४ (पुरुष: ४१८०, स्त्री: १५३३, इतर: १) | ११५ (पुरुष: ८६, स्त्री: २९) |
| ४ | वाशिम | ३१८५ (पुरुष: २४९२, स्त्री: ६९३) | ३०६० (पुरुष: २४१२, स्त्री: ६४८) | १२५ (पुरुष: ८०, स्त्री: ४५) |
| ५ | बुलढाणा | ८६४८ (पुरुष: ६३४४, स्त्री: २३०४) | ८०५५ (पुरुष: ६०६२, स्त्री: १९९३) | ५९३ (पुरुष: २८२, स्त्री: ३११) |
| एकुण | ३०८६५ (पुरुष: २१६३६, स्त्री: ९२२७, इतर: २) | २९८१६ (पुरुष: २१०७२, स्त्री: ८७४२, इतर: २) | १०४९ (पुरुष: ५६४, स्त्री: ४८५) |
एकूण ३०,८६५ प्राप्त अर्जांपैकी २९,८१६ अर्ज पात्र ठरले असून, १,०४९ अर्ज अपात्र ठरले आहेत. ज्या शिक्षकांचे नाव मतदार नोंदणीत राहिलेले आहे, त्यांना अमरावती विभाग शिक्षक संघामध्ये नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
