‘जनतेचा जाहीरनामा’ तयार करा! पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांशी भाजपाचा थेट संवाद
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या महत्त्वाच्या सूचना; आगामी ५ दिवसांत इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ४ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांची पिंपळे-सौदागर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या नियोजनाबाबत कठोर सूचना दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, नागरिकांना अपेक्षित विकासकामांसाठी किंवा सुधारणांसाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधा आणि त्यांच्या योग्य सूचना संकलित करून लोककेंद्रीत जाहीरनामा तयार करा. तसेच, पक्षाच्या सत्ताकाळात केलेली विकासकामे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प घराघरात पोहोचतील, याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
चंद्रकांत पाटील यांनी बैठकीदरम्यान शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज वितरणाची कार्यवाही त्वरित सुरू करण्यास सांगितले.
-
अर्ज प्रक्रिया: आगामी ५ दिवसांत इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेणे आवश्यक आहे. सदरचे अर्ज पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून वितरित केले जातील आणि अर्जांचा स्वीकार स्वतः शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे करणार आहेत.
-
जनसंपर्क मोहीम: संपूर्ण शहरातील किमान ५० हजार नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांची तसेच राज्य व केंद्र सरकारच्या प्रकल्पांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी.
-
जाहीरनामा वितरण: प्रत्येक प्रभागनिहाय किमान ५ हजार घरांमध्ये पक्षाचा जाहीरनामा पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३२ प्रभागांमध्ये प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकांमध्ये उमेदवारांची क्षमता तपासणे, तसेच बूथ रचना, शक्तीकेंद्र रचना आणि कार्यप्रणाली यांचा सखोल आढावा घेण्यात येईल. शत्रुघ्न काटे यांनी यावेळी “अबकी बार १०० पार” असा आपला निर्धार असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीला प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश संयोजक राजेश पिल्ले, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी महापौर नितीन काळजे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, महिला शहराध्यक्ष सुजाता पालांडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष चेतन भुजबळ, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष अनिल घोलप, मंडलाध्यक्ष गणेश ढोरे, शिवराज लांडगे, मंगेश धाडगे, जयदीप खापरे, धरम वाघमारे, अजित बुर्डे, रामदास कुटे, अमोल डोळस, सोमनाथ तापकीर, मोहन राऊत, हर्षद नढे, अनिता वाळुंजकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी “आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागातील नागरिकांपर्यंत भाजपच्या विकासकामांची माहिती पोहोचवणे आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेणे ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी अर्ज, प्रभागनिहाय बैठक आणि जनसंपर्क या सर्व गोष्टी वेळेत आणि प्रभावी पद्धतीने राबवल्या पाहिजेत, अशा सूचना पदाधिकारी, पक्षाचे लोकप्रतिनिधी यांना दिल्या आहेत.”
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


