अमरावती जिल्ह्यातील २३ गावे होणार ‘स्मार्ट’! ग्रामीण विकासासाठी ‘इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पात समावेश
चांदूर बाजार आणि अमरावती तालुक्यात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण आणि ई-सेवा पुरवण्याचा निर्णय; ग्रामस्तरीय समिती करणार अंमलबजावणी
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ४ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत जिल्ह्यातील एकूण २३ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध स्मार्ट सेवा टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत.
प्रामुख्याने चांदूर बाजार आणि अमरावती तालुक्यातील गावांचा यात समावेश आहे:
-
चांदूर बाजार तालुक्यातील गावे: बोराळा, आसेगाव, बेलोरा, टाकरखेडा पूर्णा, चिंचोली काळे, तळणी पूर्णा, वडूरा, धानोरा, खरवाडी, सर्फाबाद, खराळा, फुबगाव, जवळा शहापूर, राजुरा, जैनपूर, बेसखेडा, तळवेल, शिरजगाव बंड, रसुल्लापुर, हैदतपूर, कृष्णापूर, विरूळ पूर्णा.
-
अमरावती तालुक्यातील गाव: शिराळा.
या ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पांतर्गत ग्रामस्थांना खालील प्रमुख सेवा उपलब्ध होणार आहेत:
-
स्मार्ट सेवा: सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, वाय-फाय हॉटस्पॉट सुविधा.
-
डिजिटल सेवा: डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण आदी विभागाच्या ऑनलाईन सेवा आणि ई-प्रकल्प.
-
तंत्रज्ञान वापर: स्मार्ट कृषी सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (MITC) हे भारतनेट फेज २ नेटवर्कच्या देखमालीसह आवश्यक तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देणार आहे.
प्रकल्पाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे:
-
ग्रामस्तरीय समिती: प्रत्येक निवडक गावात प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग उपलब्ध करून घेईल.
-
जिल्हास्तरीय समिती: जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती संपूर्ण प्रकल्पाचे पर्यवेक्षण करेल.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
