‘हरित सेतू हटाव, प्राधिकरण बचाव!’ निगडी-आकुर्डीत नागरिकांचा उत्स्फूर्त ‘रास्ता रोको’ आंदोलन
एनपीआरएफ फाउंडेशनचा मनपाच्या कोट्यवधींच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाला तीव्र विरोध; अनावश्यक प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात वाढण्याचा इशारा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ४ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाविरोधात निगडी-आकुर्डी प्राधिकरण परिसरातील नागरिकांनी बुधवारी (दि. ३ डिसेंबर २०२५) हुतात्मा चौक, आनंद हॉस्पिटल जवळ, निगडी प्राधिकरण येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. “हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव” अशा जोरदार घोषणा देत “निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरम फाउंडेशन” (एनपीआरएफ फाउंडेशन) या संस्थेच्या नेतृत्वाखाली हे उत्स्फूर्त आंदोलन करण्यात आले.
नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
एनपीआरएफ फाउंडेशनने आरोप केला आहे की, महापालिकेकडून सुरू असलेला कोट्यवधी रुपये खर्च होणारा हा हरित सेतू प्रकल्प अनावश्यक आणि गरजेचा नसतानाही जबरदस्तीने राबविला जात आहे.
-
पर्यावरणाची हानी: या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून वाढलेली देशी झाडे तोडण्यात येतील, ज्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होईल.
-
वाहतूक कोंडी: सर्व रस्ते छोटे करून पदपथ मोठे केले जात असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या वाढेल आणि अपघात होण्याची शक्यता आहे.
-
गरज नसताना खर्च: या परिसरातील नागरिक, वाहतुकीची सध्याची परिस्थिती किंवा परिसराची रचना याचा कोणताही विचार न करता हा खर्चिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
-
गंभीर वाहतूक प्रश्न: रावेत, पुनावळे तसेच द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी या परिसरात अहोरात्र मोठी वाहतूक असते, त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.
संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील शेकडो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनी काळे झेंडे दाखवून, काळ्या फिती लावून आणि हातात निषेधाचे फलक धरून प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवला. यानंतर संस्थेच्या वतीने नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली, ज्यात शेकडो नागरिकांनी सह्या करून प्रकल्पाला विरोध दर्शवला.
या प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांनी यापूर्वी वेळोवेळी निवेदने दिली आहेत, मात्र महापालिकेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ‘झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासना’ विरोधात नागरिकांनी हा रास्ता रोको केला.
“हा हरित सेतू प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल,” असा इशारा एनपीआरएफ फाउंडेशनने दिला आहे.
आंदोलनाच्या नियोजनात संस्थेचे मार्गदर्शक व माजी महापौर आर. एस. कुमार, समन्वयक निलेश शिंदे, अतुल भोंडवे, अर्जुन दलाल, प्रतिभा जोशी, सूर्यकांत मुथीयान, चंद्रकांत कोठारी, अश्विन खरे, अविनाश मोरे, राजेंद्र बाबर, रवी हिंगे, अमोल निकम, बाळा दानवले, समीर जावळकर, विलास कुटे, आकाश शेट्टी, सुनील पाटील, झीशान सय्यद, सतीश काळभोर, चेतन चाफळकर यांनी सहभाग घेतला.
या आंदोलनात शैलजा मोरे, अनुप मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ, अमित गावडे, भारती फरांदे, धनंजय काळभोर, आप्पा बागल, आबा ताकवणे, योगेश बाबर, विजय शिणकर, वैभवी घोडके, श्रीमंत जगताप, बाळा शिंदे, रामभाऊ पांढरकर, अतुल इनामदार, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुलुक व सभासद, विविध सामाजिक संघटना व सोसायट्यांचे पदाधिकारी आदींसह सर्वपक्षीय नेते व माजी नगरसेवक, नगरसेविका यांनी सक्रिय सहभाग घेतला.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

