वल्लभनगरमध्ये अग्निशमन जवानांचे ‘स्विफ्ट रेस्क्यू’! दुसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या तरुणाचे वाचवले प्राण
वरिष्ठ फायरमन भूषण येवले यांच्या नेतृत्वाखाली पथकाची प्रसंगावधानता; दीपक कोठे यांनी दाखवली चपळाई
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर येथील किल्लेदार गार्डनसमोर मंगळवारी (दि. २ डिसेंबर २०२५) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याच्या उद्देशाने चढलेल्या या तरुणाला अग्निशमन दलाच्या पथकाने प्रसंगावधान दाखवत सुरक्षित खाली आणले.
नागरिकांमार्फत माहिती मिळताच पिंपरी येथील मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्षास याची कल्पना देण्यात आली आणि तात्काळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ फायरमन भूषण येवले यांच्या नेतृत्वात पथकाने त्वरित ‘स्विफ्ट रेस्क्यू ऑपरेशन’ राबवले.
-
तंत्रशुद्ध मोहीम: अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी सांगितले की, बचाव पथक प्रमुख भूषण येवले यांनी अत्यंत संयमाने आणि धोका ओळखून, संबंधित तरुणास बोलण्यात व्यस्त ठेवून त्याचे लक्ष विचलित केले.
-
चपळाई: पथक प्रमुखाचा इशारा मिळताच अग्निशामक जवान दीपक कोठे यांनी अत्यंत चपळतेने धोकेदायक स्थितीत झेप घेत त्या व्यक्तीवर प्रथम नियंत्रण मिळवले आणि त्याला सुरक्षितपणे इमारतीच्या खाली आणले.
बचाव पथकाच्या या त्वरित आणि प्रशिक्षित कार्यवाहीमुळे एक मोठी संभाव्य दुर्घटना टाळण्यास अग्निशमन विभागास यश मिळाले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी या कामगिरीबद्दल बोलताना सांगितले की, “अग्निशमन दलासाठी प्रत्येक आपत्ती म्हणजे वेळेशी सुरू असलेली शर्यत असते. वल्लभनगर येथील घटना याला अपवाद नव्हती. जवानांनी परिस्थितीचे अचूक मूल्यमापन केले आणि प्रशिक्षित पद्धतीने व्यक्तीस सुरक्षित खाली आणले.”
या बचाव मोहिमेत वरिष्ठ फायरमन भूषण येवले, फायरमन दीपक कोठे, तेजस पवार, जय जमादार, स्नेहा जगताप, वाहनचालक विशाल बानेकर यांच्यासह दलातील इतर जवानांनी समन्वयाने कार्यवाही केली.
अग्निशमन विभागाने नागरिकांना अशा प्रकारची कोणतीही घटना आढळल्यास तात्काळ १०१ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
