भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ मोशी, पुणे येथे सुरू; शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
१० ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान ३० एकरावर ६०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग; ‘मातीमोल’ आणि ‘मनाची मशागत’ विशेष उपक्रम
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या ‘किसान’ कृषी प्रदर्शनाचे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी येथे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. किसान मालिकेतील हे ३३ वे कृषी प्रदर्शन असून, ते दिनांक १० ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन यावर्षी ३० एकर क्षेत्रावर विस्तारित आहे.
किसान प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करत आहेत. प्रदर्शनाच्या कालावधीत देशभरातून दोन लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
यंदा किसान प्रदर्शनात विभागवार दालने उभी करण्यात आली आहेत:
-
संरक्षित शेती
-
पाणी नियोजन
-
कृषी निविष्ठा
-
यंत्रसामुग्री
-
पशुधन
-
जैव ऊर्जा
-
वाटिका
-
शेती लघु उद्योग
शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आयोजित केले आहे. या प्रदर्शनाला भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा तसेच कृषी विभाग महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवर संस्थांचा सहभाग लाभला आहे.
-
पूर्वनोंदणी: ३०,००० हून अधिक शेतकऱ्यांनी मोबाईलद्वारे पूर्वनोंदणी केली असून, ही संख्या १,००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.
-
डिजिटल प्लॅटफॉर्म: प्रदर्शक कंपन्या किसान डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या उत्पादनांची यादी प्रसिद्ध करू शकतात, ज्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील १० लाख शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचणार आहे.
-
किसान जागर: शेतीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘किसान जागर’ हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
-
मातीमोल: मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. मातीच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
-
मनाची मशागत: IPH च्या सहकार्याने शेतकऱ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित केला आहे. ताणतणाव आणि भावनिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर लक्ष केंद्रित करून तज्ञांशी संवाद साधण्याची संधी यात मिळणार आहे.
-
मधमाशीशी मैत्री: प्रभावी परागीकरणासाठी मधमाशांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ‘बसवंत हनीबी पार्क अँड ट्रेनिंग सेंटर’ यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रदर्शकांना आणि अभ्यागतांना व्यावसायिक चर्चा करण्यासाठी बिझनेस लाउंजची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे कृषी व्यावसायिकांना सहयोग आणि भागीदारीसाठी प्रोत्साहन मिळेल.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
