पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक: १५ जानेवारीला मतदान! मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
ईव्हीएम जोडणीपासून ते मॉक पोलपर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण; प्रशिक्षणास दांडी न लावता राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांचे आवाहन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.२१ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२५): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा बिगुल वाजला असून, येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात पार पडले.
तीन टप्प्यांत पार पडलेल्या या सत्रात अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “मतदान केंद्रावर नियुक्त झाल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सर्व अधिकार प्राप्त होतात. प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी प्रशिक्षणादरम्यानच सर्व शंकांचे निरसन करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रशिक्षण सत्राला उपस्थित राहणे अनिवार्य आहे.”
विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे महत्त्व अधोरेखित करत, हे काम एक ‘राष्ट्रीय कर्तव्य’ म्हणून जबाबदारीने पार पाडण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षणात संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) मतदानाच्या दिवशी करावयाच्या कार्यवाहीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होता:
-
-
EVM जोडणी: बॅलेट युनिट (BU) आणि कंट्रोल युनिट (CU) यांची अचूक जोडणी.
-
मॉक पोल (Mock Poll): प्रत्यक्ष मतदानापूर्वी राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणारी चाचणी मतदान पद्धत.
-
मतदान केंद्राची उभारणी: मतदान कक्षाची रचना, सुरक्षा व्यवस्था आणि साहित्याची तपासणी.
-
टपाली मतदान: निवडणूक ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची प्रक्रिया.
-
मतदान संपल्यानंतरची प्रक्रिया: मशिन सीलबंद करणे आणि साहित्य स्वीकृती केंद्रावर जमा करणे.
-
या प्रशिक्षण सत्रास सह आयुक्त मनोज लोणकर, निवडणूक निर्णय अधिकारी हणुमंत पाटील, दीप्ती सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र कुलकर्णी, प्रवीण ढमाले, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.
मुख्य प्रशिक्षक नरेंद्र बंड, रामेश्वर पवार, शिवाजी लाटे, किशोर शिंदे आणि आनंदकर यांनी ईव्हीएम हाताळण्याबाबत सविस्तर प्रात्याक्षिके दाखवून कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक प्रश्नांना उत्तरे दिली.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



