संकल्प विकासाचा, तुतारी नाद विजयाचा! प्रभाग २८ मध्ये विशाल जाधव यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
‘प्रगत प्रभागाची ब्ल्यूप्रिंट’ घेऊन विशाल अनंतराव जाधव रिंगणात; हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक २७ डिसेंबर २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज .
पिंपरी-चिंचवड (दि. २७ डिसेंबर २०२५): “पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारातून ऐतिहासिक विकासकामे झाली आहेत. याच कामांच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादाने प्रभाग २८ मधून ‘तुतारी’ वाजवणारा निष्ठावान उमेदवारच विजयी होईल,” असा ठाम विश्वास विशाल अनंतराव जाधव यांनी व्यक्त केला.
आज शनिवार, २७ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष विशाल अनंतराव जाधव यांनी आपले हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह प्रभाग क्र. २८ (पिंपळे सौदागर-रहाटणी) मधून अत्यंत उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज भरण्यापूर्वी विशाल जाधव यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाबोधी बुद्ध विहार येथे जाऊन बुद्ध वंदना घेतली. त्यानंतर ग्रामदैवत श्री मुंजोबा मंदिरात अभिषेक व दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पास नतमस्तक होऊन त्यांनी प्रचाराचा ‘तुतारीनाद’ केला. हलगी आणि पिपाणीच्या निनादात निघालेल्या या भव्य रॅलीने संपूर्ण पिंपळे सौदागर-रहाटणी परिसर दणाणून सोडला होता.
या शक्तीप्रदर्शनावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यामध्ये:
-
प्रताप गुरव (प्रदेश उपाध्यक्ष, बारा बलुतेदार महासंघ)
-
दशरथ आबा राऊत (धनगर समाज नेते)
- संजय कदम (भटक्या विमुक्त समाज नेते)
यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
गेल्या १५ दिवसांपासून विशाल जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता जाधव यांनी प्रभागात प्रचाराचा धडाका लावला आहे. फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लॅनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर गावठाण, कुणाल आयकॉन, रोझ लॅक आणि गोविंद गार्डन यांसारख्या प्रमुख सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये पदयात्रा काढून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आहे. एक कार्यक्षम आणि ओबीसी समाजाचा बुलंद आवाज म्हणून विशाल जाधव यांची प्रभागात ओळख निर्माण झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना विशाल जाधव म्हणाले, “माझ्या प्रभागाच्या प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी आणि राहणीमान उंचावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. प्रगतीची नवी दिशा दाखवण्यासाठी आम्ही ‘विकासाची ब्ल्यूप्रिंट’ तयार केली असून, जनतेच्या एकजुटीने आम्ही हा विजय नक्कीच मिळवू!”
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
