‘अथर्व सुदामे लाईव्ह’ प्रयोगात नाट्य रसिकांनी घुमवला मतदानाचा जागर; १५ जानेवारीला मतदानाचा घेतला निर्धार
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात लोकशाहीचा जागर; ‘रिल स्टार’ अथर्व सुदामे कडूनही १००% मतदानाचे आवाहन
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड (दि. ३० डिसेंबर २०२५): मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पाहायला मिळाला. निमित्त होते सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याच्या ‘अथर्व सुदामे लाईव्ह…’ या कार्यक्रमाचे. यावेळी उपस्थित शेकडो नाट्य रसिकांनी आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत १५ जानेवारी रोजी निर्भयपणे मतदान करण्याची सामूहिक शपथ घेत लोकशाहीचा जागर केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ‘स्वीप’ (SVEEP) अंतर्गत मतदान जनजागृतीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
-
उपस्थिती: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थित प्रेक्षकांना मतदानाची शपथ दिली.
-
प्रेक्षकांचा प्रतिसाद: नाटकाच्या प्रयोगाला आलेले युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार व्यक्त केला. मनोरंजनासोबतच आपल्या शहराच्या भवितव्यासाठी मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची भावना प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केली.
“आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू… धर्म, जात, पंथ किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करू,” अशा शब्दांत प्रेक्षागृहात लोकशाहीचा जयघोष करण्यात आला.
या उपक्रमात सहभागी होत सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा अथर्व सुदामे यानेही मतदारांना साद घातली. तो म्हणाला:
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदान १५ जानेवारी रोजी आहे. शहरातील सर्व मतदारांनी, विशेषतः तरुणांनी १००% मतदान करून लोकशाहीने दिलेला आपला पवित्र हक्क बजावावा आणि राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.”
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दिला जाणारा हा संदेश समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. महापालिकेच्या या उपक्रमाचे नाट्य रसिकांनी विशेष कौतुक केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

