सायकलिंग स्पर्धेचा थरार: २३ जानेवारीला पिंपरी-चिंचवडमधील शाळा दुपारी १२ नंतर बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २२ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज
पिंपरी : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर सज्ज झाले आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी २३ जानेवारी २०२६ रोजी शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व सरकारी व खाजगी शाळा दुपारी १२ वाजेनंतर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
स्पर्धेचा मार्ग ज्या भागातून जाणार आहे, त्या परिसरातील शाळांना हा आदेश लागू असेल. यात प्रामुख्याने खालील भागांचा समावेश आहे:
-
सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे.
-
निगडी प्राधिकरण, त्रिवेणीनगर, चिखली, काळेवाडी.
-
इंद्रायणीनगर, भोसरी एम.आय.डी.सी., चिंचवड एम.आय.डी.सी.
-
यशवंतनगर (पिंपरी) आणि परिसरातील सर्व शैक्षणिक संस्था.
स्पर्धेचा हा चौथा टप्पा बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून सुरू होईल. त्यानंतर राजीव गांधी पुलावरून ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करेल. सांगवी, वाकड, निगडी, त्रिवेणीनगर, भोसरी, चिखली आणि काळेवाडी अशा विविध भागांतून फिरून ही स्पर्धा पुन्हा पुणे शहराच्या हद्दीत प्रवेश करणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाची ही स्पर्धा सुरक्षितपणे पार पडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट नियोजन केले आहे. स्पर्धा सुरू असताना संबंधित मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नागरिकांनी आणि पालकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
