“अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व!” प्रशांत शितोळे यांच्या रूपाने महापालिकेत भाजपची रणनीती होणार अधिक धारदार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३१ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीने ८४ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर, आता महापालिकेतील या सर्वात मोठ्या गटाच्या नेतेपदी प्रभाग क्र. ३२-ड मधील ज्येष्ठ नगरसेवक श्री. प्रशांत कृष्णराव शितोळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या निवडीला आणि ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट’ या अधिकृत गट नोंदणीला मान्यता दिली आहे.
३० जानेवारी २०२६ रोजी भाजपच्या सर्व ८४ नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नवनिर्वाचित सदस्यांनी एकत्रितपणे ‘भारतीय जनता पार्टी गट’ स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. या निवडीचे पत्र आणि गटाची माहिती आता विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे अधिकृत नोंदणीसाठी सादर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्याकडेही या निवडीची प्रत माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.
प्रशांत शितोळे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि अभ्यासू नाव आहे. त्यांच्या राजकीय प्रवासातील काही महत्त्वाचे पैलू:
-
प्रदीर्घ अनुभव: सांगवी आणि पिंपळे गुरव (प्रभाग ३२) मधून सलग निवडून येत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
-
प्रशासकीय पकड: स्थायी समिती सदस्य, स्थायी समिती सभापती,विधी समिती सभापती आणि प्रभाग समिती अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केल्यामुळे त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.
-
विकासाचा पॅटर्न: सांगवी परिसरातील रस्ते, उद्याने आणि पाणीपुरवठा योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांचा मोठा वाटा आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
