“आधुनिक पिंपरी-चिंचवडसाठी भाजपचे नवे सारथी सज्ज”: शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे; महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर व पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा जंगी सत्कार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, शहराच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आज भव्य सत्कार करण्यात आला. मोरवाडी येथील भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालयात महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा सोहळा म्हणजे आगामी पाच वर्षांच्या ‘विकास पर्वाचा’ शंखनाद असल्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी यावेळी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात शत्रुघ्न काटे यांनी विजयाचे संपूर्ण श्रेय सामान्य कार्यकर्त्यांना दिले. ते म्हणाले, “आमच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने हा गड सर केला आहे. आज महापौर, उपमहापौर पदी विराजमान झालेले नेतृत्व हे जमिनीवरचे नेतृत्व आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या योजना शहराच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हेच या पदाधिकाऱ्यांचे मुख्य लक्ष्य असेल.”
सत्काराला उत्तर देताना महापौर रवि लांडगे यांनी आपल्या प्राधान्यक्रमांची स्पष्टोक्ती केली. ते म्हणाले, “शहरातील २४ तास पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती देणे हे माझे पहिले कर्तव्य असेल. अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आम्ही राज्य सरकारशी समन्वय साधू.”
उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा आणि स्वावलंबनाचा मुद्दा अधोरेखित केला. महापालिका शाळांचा दर्जा उंचावणे आणि आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी सांगितले. महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष योजना आखणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प केला. “सभागृहात जनतेच्या पैशांचा विनियोग योग्य कामांसाठीच होईल, याची मी खात्री देतो. फाईल्सचा जलद निपटारा ही आमची कामाची पद्धत असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे, सुजाता पालांडे, मधुकर बच्चे, वैशाली खाडये, विकास डोळस, माजी महापौर राहुल जाधव, दिनेश यादव, गणेश ढोरे, कैलास सानप, कविता हिंगे यांसह नवनिर्वाचित नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर शेडगे यांनी केले, सूत्रसंचालन वैशाली खाडये यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर बच्चे यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


