“विरोधाला विरोध नाही, पण चुकीच्या कामांना सोडणार नाही!” विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर कडाडले; महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिला कडक इशारा
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ९ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही केवळ विरोधाला विरोध करणार नाही, तर जनहिताच्या कामात सहकार्य करू. मात्र, जर प्रशासनाने किंवा सत्ताधाऱ्यांनी चुकीची कामे केली, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना भोईर म्हणाले की, “भारतीय जनता पक्षामध्ये आज जे ८४ नगरसेवक आहेत, त्यापैकी ८० नगरसेवक हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आहेत. त्यामुळे सभागृहात अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा जपणारेच लोक बसलेले असतील.” अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आणि पक्षाची जबाबदारी म्हणून हे पद स्वीकारल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
शहरातील ज्वलंत प्रश्नांवर भाऊसाहेब भोईर यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले:
-
पाणी समस्या: पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. “कार्यकारी अभियंत्यांपेक्षा व्हॉल्व्ह फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाण्याचे नियोजन अधिक चांगले समजते,” असे म्हणत त्यांनी प्रशासकीय नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवले.
-
अर्बन स्ट्रीट: अर्बन स्ट्रीट प्रकल्पामुळे शहरातील रस्ते अरुंद झाले असून, काही अधिकारी केवळ वरिष्ठांना खूश करण्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
हॉकर्स झोन: हातगाडी आणि पथारीवाल्यांसाठी तातडीने स्वतंत्र हॉकर्स झोन तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दिवंगत नेते अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्याचा विषय प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला धमकी देण्याच्या प्रकरणावर त्यांनी संताप व्यक्त केला. “महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीमागील सूत्रधारांचा शोध घ्यावा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
-
नदीकाठावरील स्मशानभूमीचे डीपी आरक्षण हटवण्यासाठी पाठपुरावा करणार.
-
शाळांमधील मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवणार.
-
नियमबाह्य कामे झाल्यास संबंधित प्रकल्पांची चौकशी लावणार.
भाऊसाहेब भोईर यांनी सहाव्यांदा नगरसेवक म्हणून सभागृहात प्रवेश केला असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आता महापालिकेत विरोधकांचा आवाज अधिक बुलंद होणार असल्याचे दिसून येत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
