महापालिका प्रशासनात मोठी खळबळ! एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार; महापौर रवी लांडगे यांचे आयुक्तांना बदलीचे आदेश
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ११ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. महापालिका आस्थापनेवरील जे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत, त्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे लेखी आदेश महापौरांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. महापौरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महापौर रवी लांडगे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, स्थापत्य, नगररचना, बांधकाम परवाना, करसंकलन आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये अनेक अभियंता, लेखापाल आणि लिपिक वर्षानुवर्षे एकाच जागी कार्यरत आहेत. एकाच ठिकाणी दीर्घकाळ राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांचे स्थानिक स्तरावर हितसंबंध निर्माण झाले असून, त्यातून ‘अर्थपूर्ण वाटाघाटी’ आणि भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. हे शहराच्या वैभवासाठी आणि महापालिकेच्या प्रतिमेसाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
-
महत्त्वाचे विभाग: स्थापत्य, पर्यावरण, नगररचना, बांधकाम परवाना.
-
महसूल व आरोग्य: करसंकलन, आरोग्य, वैद्यकीय विभाग.
-
प्रशासकीय: भांडार विभाग, लेखा विभाग.
-
पदभार: कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मुख्य लिपिक, लेखापाल व भांडारपाल.
अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतरही नियमानुसार त्यांची बदली दुसऱ्या विभागात होणे अपेक्षित होते. मात्र, विभागप्रमुखांच्या मर्जीतील असल्याने पदोन्नती मिळूनही अनेक जण जुन्याच जागेवर कार्यरत आहेत. विभागप्रमुख आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोडण्यास विरोध करत असल्यामुळे पारदर्शकतेला हरताळ फासला जात असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने इतरत्र बदली करून प्रशासनात फेरबदल करण्यात यावेत आणि केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल महापौर कार्यालयास सादर करावा, अशा कडक सूचना रवी लांडगे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. महापौरांच्या या भूमिकेमुळे आता प्रशासकीय सुसूत्रता येईल आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे विनासायास होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
