निगडीत घुमली ‘शिवगर्जना’! २५० कलाकारांच्या संचात साकारला स्वराज्याचा जिवंत इतिहास; पहिल्या प्रयोगाला शिवप्रेमींची अलोट गर्दी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १८ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘हर हर महादेव’च्या गगनभेदी जयघोषाने निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वा’ अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला हजारो शिवप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली.
महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते या महानाट्याचा दिमाखदार शुभारंभ झाला. या ऐतिहासिक सोहळ्याला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
राष्ट्रपती महोदयांसमोर सादर झालेल्या या महानाट्यात २५० हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. घोडे, उंट, भव्य रंगमंच, पारंपारिक वेशभूषा आणि अत्याधुनिक लेझर लाइटच्या साहाय्याने शिवकाळातील प्रत्येक प्रसंग जिवंत करण्यात आला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक दृश्याचे स्वागत केले.
महानाट्यातील मुख्य आकर्षणे:
-
ऐतिहासिक प्रसंग: शिवजन्मापूर्वीचा काळ, बालपण, तोरणा विजय आणि अफजलखान वध (प्रतापगड मोहीम).
-
भक्ती-शक्ती भेट: संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट.
-
शौर्यगाथा: पन्हाळगड वेढा, आग्र्याहून सुटका आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा सिंहगड विजय.
-
भव्य सांगता: अंगावर शहारे आणणारा शिवराज्याभिषेक सोहळा.
या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, अभिषेक बारणे, चेतन भुजबळ, नगरसेविका शैलजा मोरे, अर्चना कारंडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. तसेच जीवन बोराडे, सागर तापकीर, निलेश शिंदे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
“इतिहास केवळ वाचण्याचा विषय नसून तो अनुभवण्याचा आहे. ‘शिवगर्जना’च्या माध्यमातून महाराजांचे सुशासन आणि पराक्रम नव्या पिढीसमोर येत आहे. यातून युवकांना स्वराज्याच्या मूल्यांची प्रेरणा मिळेल,” अशी भावना महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली.
महापालिकेने नागरिकांसाठी उत्तम बैठक व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. या महानाट्याचे पुढील दोन प्रयोग १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता याच ठिकाणी होणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



