पिंपरी-चिंचवड मनपाच्या रिकाम्या ‘तिजोरी’वर आता कोणाची सत्ता? स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड संपन्न; अभिषेक बारणे की संदीप कस्पटे? अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आज, २० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापालिकेची अत्यंत महत्त्वाची आणि ‘तिजोरीची चावी’ समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनाही प्रतिनिधीत्व मिळाले आहे. आता या समितीतून अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे ११, राष्ट्रवादीचे ४ आणि शिवसेनेचा १ सदस्य अशा १६ जणांची निवड झाली आहे.
भारतीय जनता पक्ष (११ सदस्य):
अभिषेक बारणे, शालिनीताई गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, शीतल वर्णीकर, कृष्णा सुरकुले, अर्चना कारंडे, मधुरा शिंदे आणि बाबासाहेब त्रिभुवन.
राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (४ सदस्य):
सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे आणि विकास साने.
शिवसेना – शिंदे गट (१ सदस्य):
सुलभा उबाळे.
स्थायी समितीच्या सदस्य निवडीनंतर आता अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला आहे. यामध्ये दोन प्रमुख नावे चर्चेत आहेत:
१. अभिषेक बारणे (थेरगाव):
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे आडनाव भाऊकी आणि थेरगाव प्रभागातून तिसऱ्यांदा निवडून आलेले अभिषेक बारणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बारणे फॅक्टर’ नेहमीच प्रभावी राहिला आहे. विशेष म्हणजे, २००० साली खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनीही स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते, नुसतेच अध्यक्षपद भुसवले नाही तर ते अध्यक्षपद खेचून आणले त्यामुळे तोच वारसा अभिषेक बारणे चालवतील अशी दाट शक्यता आहे.
२. संदीप कस्पटे (वाकड):
दुसरीकडे, चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आणि वाकडचे नगरसेवक संदीप कस्पटे हे देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कस्पटे हे देखील दुसऱ्यांदा निवडून आले असून, जगताप गटाकडून त्यांच्या नावासाठी मोठा आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती आणि आगामी विकासकामांच्या निविदा पाहता, स्थायी समितीचे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे आहे. चिंचवड विधानसभेतील दोन दिग्गज नेत्यांच्या समर्थकांमध्ये ही लढत असल्याने, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणाच्या पारड्यात वजन टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होऊन अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
