news
Home पिंपरी चिंचवड ‘देवाभाऊंनी’ राखला आमदारांचा शब्द! संदीप कस्पटे यांचे नाव मागे पडले; पक्षांतर्गत गटबाजीमुळे स्थायीच्या निवडणुकीत मोठी रंगत

‘देवाभाऊंनी’ राखला आमदारांचा शब्द! संदीप कस्पटे यांचे नाव मागे पडले; पक्षांतर्गत गटबाजीमुळे स्थायीच्या निवडणुकीत मोठी रंगत

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला; मुख्यमंत्र्यांनी फिरवली कोअर कमिटीची शिफारस, अभिषेक बारणे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापालिकेत ‘हायव्होल्टेज’ राजकीय नाट्य! भाजप कोअर कमिटीची शिफारस डावलून अभिषेक बारणे रिंगणात; आमदारांच्या दबावापुढे ‘कोअर कमिटी’ बॅकफूटवर?


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्तेची किल्ली मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अखेर अभिषेक बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, या निवडीमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि आमदारांचे वाढलेले वर्चस्व पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. पक्षाच्या कोअर कमिटीने संदीप कस्पटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले असतानाही, आमदारांच्या दबावामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही शिफारस धुडकावून बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बुधवारी (दि. २५) अभिषेक बारणे यांनी नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे आपला अर्ज सुपूर्त केला. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, आमदार शंकर जगताप, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, विनोद नढे, नितीन काळजे, राजू मिसाळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भाजपमध्ये सध्या आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे चार स्वतंत्र गट कार्यरत आहेत.

  • कस्पटे यांचे नाव ठरले होते: कोअर कमिटीतील सात सदस्यांनी संदीप कस्पटे यांच्या नावाचा प्रस्ताव प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवला होता.

  • आमदारांची नाराजी: आपल्या शिफारसीला महत्त्व न मिळाल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असा पवित्रा आमदार जगताप यांनी घेतला. हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचले. अखेर ‘देवाभाऊंनी’ आमदारांच्या शब्दाला मान देत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना बदल करण्याचे आदेश दिले.

स्थायी समिती सदस्यपदी संधी मिळालेले दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक बाबा त्रिभुवन यांच्या नावाचीही अध्यक्षपदासाठी दबक्या आवाजात चर्चा होती. दलित कार्ड आणि प्रशासकीय अनुभवामुळे त्यांचे नाव शर्यतीत होते, मात्र शेवटी अभिषेक बारणे यांचे नाव निश्चित झाले. दुसरीकडे, ज्येष्ठतेचा सन्मान मिळत नसल्याने शीतल उर्फ विजय शिंदे यांनी उपमहापौरपद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे पक्षात असलेली ‘खदखद’ समोर आली आहे.

येत्या शनिवारी स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने अभिषेक बारणे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, कोअर कमिटीला डावलून झालेली ही निवड भविष्यात पक्षांतर्गत संघर्षाला नवे वळण देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!