यशस्वीच्या विद्यार्थ्यांचा मैदानावर ‘यशस्वी’ खेळ! आयआयएमएस आणि आयबीएमआरचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात; खेळाडूंनी गाजवले मैदान
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०१ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “जीवनात केवळ यशालाच महत्त्व नसून, अपयशातूनही हार-जीत स्वीकारण्याची मोठी शिकवण खेळांतून मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात किमान एका तरी क्रीडा प्रकाराचा सातत्याने सराव करायला हवा,” असे प्रतिपादन यशस्वी संस्थेचे मनुष्यबळ व्यवस्थापन विभाग प्रमुख श्रीकांत मिरजकर यांनी केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयबीएमआर) यांच्या वतीने आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
या महोत्सवाचे उद्घाटन आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, केवळ अभ्यासात मग्न न राहता खेळांमधील सक्रिय सहभाग हा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुदृढ करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यंदाच्या महोत्सवात क्रिकेट, कॅरम आणि बुद्धिबळ अशा तीन प्रमुख क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली क्रीडाकौशल्ये दाखवून दिली.
या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी प्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. अजय बेद्रे, समर्थ चव्हाण, प्रथमेश बनसोडे, यश कोतुळकर, ओंकार बोबडे, अपर्णा मिसाळ, 8अनुष्का काळे, ओम सोनवणे, हेमंत फुलमाळी, अविनाश पाटील, सुमित गुरव आणि श्रीकांत YR2इब्त्तीदार यांनी सूत्रसंचालनासह विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
क्रीडा महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन आणि समन्वयन डॉ. वंदना मोहंती, डॉ. अश्विनी ब्रम्हे, डॉ. सचिन मिसाळ, डॉ. पुष्पराज वाघ, प्रो. गंगाधर डुकरे, प्रा. नितीन गणेशर आणि प्रा. तुषार कथाणे या प्राध्यापक वर्गाने केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
