‘सायबर सुरक्षा ही एक सामूहिक स्वयंशिस्त’! पीसीयूमध्ये पार पडली देशातील सर्वात मोठी ‘क्रेस्ट २०२६’ सायबर साक्षरता स्पर्धा; विजेत्यांवर ६ लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०५ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
वडगाव मावळ/पिंपरी : “आजच्या डिजिटल युगात संसाधने आणि वेळेची बचत होत असली, तरी सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता असणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक ज्ञान न घेता मजबूत नेटवर्क विकसित करून टीमवर्कमध्ये काम करावे. सायबर सुरक्षा ही मुळात एक सहयोगी स्वयंशिस्त आहे,” असे प्रतिपादन आयक्यूएसएसचे (IQSS) सीईओ डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा यांनी केले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठ (PCU), साते (वडगाव मावळ) येथील स्कूल ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्सच्या सायबर सुरक्षा क्लब अंतर्गत आयोजित “क्रेस्ट २०२६ – सीटीएफ (कॅप्चर द फ्लॅग)” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
या स्पर्धेत आयआयटी (IIT), एनआयटी (NIT) आणि सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सायबर सुरक्षेतील महिलांच्या सहभागावर भर देताना हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीच्या सीईओ डॉ. शिफा सायकलवाला यांनी महिलांना नेतृत्व करण्याचे आवाहन केले. हे व्यासपीठ केवळ स्पर्धेपुरते मर्यादित नसून प्लेसमेंट आणि राष्ट्रीय सुरक्षा मोहिमांसाठी मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीचे संस्थापक डॉ. रोहित गौतम यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ग्रामीण समुदायांना सायबर सुरक्षित करण्यासाठी ‘प्रोजेक्ट दुर्गा’ सारखे उपक्रम राबवले जात आहेत. सुरक्षित डिजिटल भारतासाठी सायबर साक्षरता प्रत्येक गावापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यावेळी कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या चुरशीच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांनी वर्चस्व गाजवले:
-
प्रथम क्रमांक: घोष्ट बटालियन टीम (जी. एच. रायसोनी कॉलेज, वाघोली)
-
द्वितीय क्रमांक: चक्रव्हू टीम (जी. एच. रायसोनी कॉलेज, वाघोली)
-
तृतीय क्रमांक: नेट सेल्युथ टीम (सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी, पुणे)
-
चतुर्थ क्रमांक: रेड फॉक्स टीम (सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी, पुणे)
-
पाचवा क्रमांक: डायस्थोपियन डिबगर्स टीम (पीसीसीओई, आकुर्डी)
विजेत्या संघांना एकूण सहा लाख रुपयांची बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
प्रज्वल पवार, सोहम आहेर यांसह पीसीयूच्या विद्यार्थी संघाने या स्पर्धेचे तांत्रिक प्लॅटफॉर्म यशस्वीपणे विकसित केले. या स्पर्धेसाठी अल्टर सिक्युरिटी, ऑफसेक आणि हॅक द बॉक्स यांसारख्या नामवंत कंपन्यांचे सहकार्य लाभले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, कुलपती हर्षवर्धन पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

