भाजप कार्यकर्त्यांना मिळणार विचारधारेचे धडे! शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत १४ मंडल अध्यक्षांची खलबते; ‘निवासी प्रशिक्षण महाअभियान’ राबवणार
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ०७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि पक्ष संघटन अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने “निवासी प्रशिक्षण महाअभियान” राबविण्यात येणार आहे. मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील १४ मंडल अध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये या अभियानाच्या नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या अभियानाचा मुख्य उद्देश तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीची ओळख करून देणे हा आहे. या प्रशिक्षणात प्रामुख्याने खालील विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे:
-
पक्ष विचारधारा: भारतीय जनता पक्षाची मूळ तत्त्वे आणि ध्येयधोरणे.
-
संघटनात्मक कार्यपद्धती: संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये.
-
सामाजिक व राजकीय विषय: चालू घडामोडी आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यावेळी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टीचे खरे बळ हे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. “कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले, तर पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचेल. शहरातील सर्व १४ मंडलांमध्ये हे अभियान अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवून आपण सक्षम आणि सजग कार्यकर्ते तयार करू,” असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्व मंडल अध्यक्षांनी या अभियानाला एकमताने पाठिंबा दिला आहे.
या बैठकीस संघटन सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, मधुकरभाऊ बच्चे, विकासदादा डोळस यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच मंडल अध्यक्ष मोहनभाऊ राऊत, हर्षदभाऊ नढे, सनीभाऊ बारणे, सोमनाथदादा तापकीर, गणेशभाऊ ढोरे, जयदीपभाऊ खापरे, धरमदादा वाघमारे, मंगेशदादा धाडगे, सौ. अनिताताई वाळुंजकर, योगेशभाऊ सोनवणे, रामदासभाऊ कुटे, अजितभाऊ बोर्डे, अमोलदादा डोळस, शिवराजदादा लांडगे यांसह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रशिक्षणातून तयार होणारी कार्यकर्त्यांची नवी फळी आगामी निवडणुकांमध्ये पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


