पिंपरी-चिंचवडला ‘माझी वसुंधरा’मध्ये अव्वल करण्यासाठी झटून काम करा; महापौर रवि लांडगे यांनी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात घेतला विकासकामांचा आढावा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, ११ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी/नेहरूनगर : “शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार मूलभूत सुविधा पुरवणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपरी-चिंचवड शहराला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी आता युद्धपातळीवर समन्वयाने काम करावे,” असे स्पष्ट निर्देश महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले.
नेहरूनगर येथील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित आरोग्य, पाणीपुरवठा, अतिक्रमण आणि उद्यान विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते.
-
पाणीपुरवठा नियोजन: प्रत्येक प्रभागात योग्य दाबाने आणि ठराविक वेळेत पाणीपुरवठा झालाच पाहिजे. पाणी शुद्धीकरण यंत्रणा अधिक सक्षम करून नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौरांनी दिले.
-
कचरामुक्त प्रभागाचा संकल्प: ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो (Chronic Spots), त्या ठिकाणांचे सुशोभीकरण करा. पुढील तीन महिन्यांत प्रत्येक प्रभागातील कचरा कुंडीची ठिकाणे हटवून शहर सुबक करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
-
अतिक्रमणमुक्त रस्ते: पादचाऱ्यांना चालणे कठीण करणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
-
हॉकर्स झोन व पुनर्वसन: फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रभागनिहाय नगरसेवकांच्या सहकार्याने हॉकर्स झोनच्या जागा निश्चित कराव्यात.
-
शाळांमधील सुविधा: महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळतात की नाही, याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यावर महापौरांनी भर दिला. केवळ झाडे लावून न थांबता नागरिकांच्या सहभागातून ती जगवण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी उद्यान विभागाला केले.
या बैठकीस विधी समिती सभापती सुजाता बोराटे, माजी महापौर राहुल जाधव, वैशाली घोडेकर, नगरसदस्य तुषार सहाणे, योगेश लांडगे, निखिल बोऱ्हाडे, नगरसदस्या सारिका मासुळकर, सारिका बोऱ्हाडे, नम्रता लोंढे, अश्विनी वाबळे, रेखा देवकर, उपआयुक्त प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे आणि मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


