सावधान! घरगुती गॅसची चोरी करून कमर्शिअल सिलिंडर भरला तर आता थेट कोठडी; पोलीस आयुक्तांचे कडक कारवाईचे आदेश
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असताना, आता घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या व्यावसायिक (Commercial) सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक पाऊले उचलली आहेत.
शहरात घरगुती गॅसची टंचाई निर्माण होऊ नये आणि काळा बाजार रोखला जावा, यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आणि गुन्हे शाखेला विशेष शोधमोहीम राबवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या आखाती देशात सुरू असलेल्या इस्राईल-इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर आणि पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा परिस्थितीत काही लोक घरगुती गॅस सिलिंडरची साठेबाजी करून किंवा त्यातील गॅस काढून चढ्या दराने व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून विकण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांना गॅस तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी आयुक्तांनी ही मोठी कारवाई जाहीर केली आहे.
पोलीस आयुक्तांनी पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ नागरिकांना आवाहन केले आहे की, जर आपल्या परिसरात किंवा आसपास कुठेही घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचा प्रकार (Gas Refilling) सुरू असेल, तर तातडीने पोलिसांना कळवावे.
नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधून गोपनीयरीत्या माहिती देऊ शकतात:
-
पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्ष: ०२०-२७३५२६०० / ०२०-२७३५२५००
-
मोबाईल क्रमांक: ९५२९६९१९६६
-
आणीबाणी सेवा: ११२ (डायल ११२)
मिळालेल्या माहितीची तातडीने दखल घेऊन संबंधित व्यक्ती किंवा गॅस एजन्सीवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने देण्यात आला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
