news
Home पिंपरी चिंचवड “हा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का?” ६ वर्षांची दिरंगाई अन् ५० कोटींच्या नव्या निविदांवरून राजकीय रणकंदन; स्थायी समितीत प्रस्तावांना बसला ‘ब्रेक’

“हा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का?” ६ वर्षांची दिरंगाई अन् ५० कोटींच्या नव्या निविदांवरून राजकीय रणकंदन; स्थायी समितीत प्रस्तावांना बसला ‘ब्रेक’

१२ कोटींचा प्रकल्प ६५ कोटींवर! मोशीतील छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात; खर्चाचा आकडा सहा पटीने वाढल्याने विरोधक आक्रमक. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


महाराजांच्या पुतळ्याला भ्रष्टाचाराचा विळखा? ६५ कोटी खर्चूनही काम अपूर्णच; ठेकेदाराला ‘रेड कार्पेट’ कशासाठी?


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

भोसरी : संपूर्ण हिंदुस्थानची अस्मिता असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोशी येथील १०० फूट उंच पुतळा उभारणीचे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गेल्या सहा वर्षांत तब्बल ६५ कोटी ८१ लाख रुपये खर्च करूनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. विशेष म्हणजे, आता कामाच्या पूर्णत्वासाठी पुन्हा ५० कोटींच्या नव्या निविदांचा घाट सत्ताधाऱ्यांकडून घातला जात असून, यावरून महापालिकेत राजकीय रणकंदन माजले आहे.

जानेवारी २०२० मध्ये भाजप सत्ताकाळात या कामाला मंजुरी मिळाली तेव्हा केवळ १२ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, वारंवार झालेली मुदतवाढ आणि प्रकल्पाची जागा बदलल्याने खर्चाचा आकडा सहा पटीने वाढला आहे.

  • जागा बदल: सुरुवातीला हा पुतळा विनायकनगर येथे होणार होता, मात्र आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनुसार तो आता पीएमआरडीएच्या (PMRDA) आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या परिसरात उभारला जात आहे.

  • खर्चाचा पाढा: आतापर्यंत पुतळा उभारणी आणि परिसरातील अनुषंगिक कामांवर ६५ कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. तरीही काम पूर्ण न झाल्याने, “हा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का?” असा बोचरा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विद्युत रोषणाई आणि स्थापत्य कामांसाठी अनुक्रमे ३२ कोटी आणि २० कोटींच्या दोन स्वतंत्र निविदांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या निविदांमध्ये ‘रिंग’ झाल्याचा आणि ठेकेदाराला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांना भाजपची एकहाती सत्ता असूनही हे प्रस्ताव तात्पुरते तहकूब करावे लागले आहेत. १३ कोटींच्या कामासाठी ठेकेदाराने ‘० टक्के’ दर दाखवणे, ही संशयास्पद बाब असल्याचेही विरोधकांचे म्हणणे आहे.

“पुतळा प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. काही अनुषंगिक कामांसाठी आर्थिक खर्चाला मान्यता मिळणे बाकी आहे. निधी उपलब्ध होताच पुढील काही दिवसांत १०० टक्के काम पूर्ण केले जाईल.”

— अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाखाली सुरू असलेला हा कोट्यवधींचा खेळ आणि वारंवार मिळणारी मुदतवाढ यामुळे मोशी आणि भोसरी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “भक्तीच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे इमले उभारले जात आहेत का?” असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!