दलितांच्या हक्काच्या २४ लाखांवर डल्ला? शेरवाडीत ‘फुले नगर’चे काम ‘सुवर्ण वस्ती’त केल्याचा खळबळजनक आरोप; चौकशीचे आदेश देऊनही अधिकारी ‘बेपत्ता’!
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, १३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मूर्तिजापूर (अकोला) : अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीच्या विकासासाठी आलेला निधी दुसऱ्याच वस्तीत वळवून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील शेरवाडी (शेलूवेताळ) येथे उघडकीस आला आहे. तब्बल २४ लाख रुपयांच्या रस्ता व नाली बांधकामात सरपंच आणि सचिवांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी पुराव्यांसह केला आहे.
जितेंद्र रामदास अनभोरे यांनी पंचायत समितीकडे दिलेल्या अधिकृत तक्रारीनुसार, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात दोन कामे मंजूर झाली होती:
१. आंबेडकर नगर: सिमेंट रस्ता व नाली बांधकाम – १२ लाख रुपये.
२. फुले नगर: सिमेंट रस्ता व नाली बांधकाम – १२ लाख रुपये.
गंभीर आरोप: फुले नगरसाठी मंजूर असलेले काम मागासवर्गीय वस्तीत करणे बंधनकारक असताना, ते काम चक्क तथाकथित ‘सुवर्ण वस्ती’त (सवर्ण वस्ती) करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय करण्यात आलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते अद्याप अपूर्णच आहे.
जितेंद्र अनभोरे यांनी २७ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीनंतर, गट विकास अधिकारी (BDO), पंचायत समिती मूर्तिजापूर यांनी ११ मार्च २०२६ रोजी एक अधिकृत पत्र (जा.क्र.पंसमु/शाअ/बांधकाम/१०५०/२६) काढले होते. या पत्रानुसार १२ मार्च २०२५ (पत्रात नजरचुकीने २०२५ नमूद, प्रत्यक्षात २०२६ अपेक्षित) रोजी सकाळी १०:३० वाजता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणे अनिवार्य होते.
मात्र, चौकशीचे आदेश देऊन दोन दिवस उलटले तरी एकही अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचलेला नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे, “दोषींना वाचवण्यासाठी प्रशासन वेळकाढूपणा करत आहे का?” असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.

या प्रकरणाची माहिती मागासवर्गीय विकास मंत्रालय (मुंबई), मुख्य कार्यकारी अधिकारी (अकोला) आणि समाज कल्याण विभाग यांनाही कळवण्यात आली आहे. अनुसूचित जातीच्या विकासाचा निधी वळवणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असून, जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत या कामाचे देयके (Payments) अदा करू नयेत, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
आता या प्रकरणातील ‘सत्य’ बाहेर काढण्यासाठी प्रशासन कधी मैदानात उतरते आणि दोषी सरपंच-सचिवांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
