पिंपरी-चिंचवड महापालिकेची विक्रमी कामगिरी! ८०० कोटींचा मालमत्ता कर वसूल; ‘अभय योजने’चे अवघे १७ दिवस शिल्लक
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे , १५ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात दमदार कामगिरी करत ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. १ एप्रिल २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत ८०० कोटी ८४ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापौर रवी लांडगे यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत.
थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी महापालिकेने ‘अभय योजना’ लागू केली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत ही योजना सुरू राहणार असून, थकीत मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत मिळत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आता अवघे १७ दिवस उरले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कर संकलन विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरात एकूण ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद आहे. विभागीय कार्यालयानुसार वसुलीचा आढावा घेतल्यास वाकड विभागाने १०१ कोटी २१ लाख रुपयांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे.
-
इतर प्रमुख विभाग: थेरगाव (८०.५६ कोटी), चिखली (६६.५४ कोटी), किवळे (५५.४६ कोटी), भोसरी (५१.८५ कोटी) आणि चिंचवड (५०.७४ कोटी).
शहरातील ५ लाख ७५ हजारहून अधिक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. मात्र, जे थकबाकीदार वारंवार आवाहन करूनही कर भरत नाहीत, त्यांच्यावर कर संकलन विभागाने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमानुसार अशा मालमत्तांची जप्ती करणे आणि नळ कनेक्शन खंडित करणे यासारखी पावले उचलली जात आहेत.
“पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी मालमत्ता कर वेळेत भरून विकासकामांना हातभार लावला आहे. ८०० कोटींहून अधिक वसुली हे नागरिकांच्या सहकार्याचे फळ आहे. थकबाकीदारांनीही ३१ मार्चपूर्वी अभय योजनेचा लाभ घ्यावा.”
— रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
“ऑनलाइन व ऑफलाइन सुविधांमुळे कर भरणा सोपा झाला आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी आता मोजकेच दिवस उरले आहेत. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी त्वरित कर भरावा.”
— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
