अकोल्यात ‘लोकअदालती’चा दणका! १४०६ प्रकरणांचा निपटारा, ५ लाखांहून अधिक दंड वसूल; नवीन कायद्यांतर्गत गुन्हेगारांना शिक्षेचा बडगा
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, १६ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला : अकोला जिल्ह्यामध्ये १४ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अकोला जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या लोकअदालतीमध्ये एकूण १४०६ केसेस निकाली काढण्यात आल्या असून, गुन्हेगारांकडून ५ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२५ च्या तुलनेत यावेळच्या लोकअदालतीत ५४२ अधिक केसेसचा निपटारा करण्यात आला आहे.
अकोला पोलीस दलाने या लोकअदालतीसाठी १५ दिवसांपूर्वीच जय्यत तयारी सुरू केली होती. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS), मोटर वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि जुगार कायद्यांतर्गत दाखल असलेल्या प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. नवीन कायद्यांतर्गत (BNS) दाखल गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी जास्तीत जास्त समन्स आणि नोटीस बजावण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती.
-
निकाली केसेस: १४०६ (डिसेंबर २०२५ च्या तुलनेत ५४२ केसेसने वाढ).
-
वसूल दंड: ५,०३,००० रुपये (डिसेंबर २०२५ च्या तुलनेत २,०५,३५० रुपयांनी वाढ).
या लोकअदालतीमुळे न्यायालयावरील प्रलंबित प्रकरणांचा भार हलका होण्यास मोठी मदत झाली असून, सामान्य नागरिकांनाही आपल्या प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याची संधी मिळाली.
ही धडाकेबाज कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील कोर्ट मॉनिटरिंग विभाग (CMS Cell) यांनी अथक परिश्रम घेतले.
या यशाबद्दल बोलताना पोलीस प्रशासनाने सांगितले की, गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची सतर्कता बाळगली जाईल.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

