आमदार-महापौर चषक टी-२० क्रिकेट: तापकीर सर्व्हिस स्टेशनचा ‘विराट’ विजय! महानगरपालिका संघावर ३५ धावांनी मात; सुशांत कांबळे ठरला सामनावीर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन क्रीडा:
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील क्रिकेट शौकिनांसाठी पर्वणी ठरलेल्या ‘आमदार-महापौर चषक टी-२० २०२६’ स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ झाला आहे. उद्घाटनाच्या सामन्यात तापकीर सर्व्हिस स्टेशन संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) संघाचा ३५ धावांनी पराभव करत स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली.
पिंपरीतील बजाज वाळके क्रिकेट मैदान येथे १६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा रंगणार असून, यामध्ये शहरातील एकूण १६ मातब्बर संघ सहभागी झाले आहेत.
महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडल्यानंतर झालेल्या पहिल्या सामन्यात महानगरपालिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र, तापकीर सर्व्हिस स्टेशनच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला.
-
तापकीर सर्व्हिस स्टेशन (२०६/४): सुशांत कांबळे याने नाबाद ८५ धावांची वादळी खेळी केली, तर सुमीत तापकीरने नाबाद ५८ धावांचे योगदान दिले. रणजित मगरने ३७ धावा फटकावत संघाला २०० पार नेले. मनपाकडून अमर मद्रासी याने २ बळी घेतले.
२०७ धावांचे विशाल लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या महानगरपालिका संघाची सुरुवात डळमळीत झाली, पण निखिल आव्हाडने खिंड लढवली.
-
महानगरपालिका संघ (१७०/८): निखिल आव्हाडने ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावांची झुंजार खेळी केली. त्याला राहुल चावरिया (४०), रवी माचरे (२३) आणि ओंकार पवार (२०) यांनी साथ दिली, मात्र तापकीर संघाच्या अचूक गोलंदाजीसमोर धावगती राखणे त्यांना जमले नाही. अखेर महानगरपालिका संघाचा डाव १७० धावांवर मर्यादित राहिला.
यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, कृष्णा पोरगे, पत्रकार विजय जगदाळे, अनिल दुराफे, शिवाजी शेळके, नागेश पडवळ आणि आयोजक दत्ता गव्हाणे उपस्थित होते. उत्कृष्ट फलंदाजीबद्दल सुशांत कांबळे याला सामनावीर (Man of the Match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
