आरोग्य व्यवस्थेचा ‘जनसंवाद’! नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आरोग्य सेवांचा सखोल आढावा; इकोनेट संस्थेचा पुढाकार, ३५० हून अधिक नागरिकांचा सहभाग
नांदगाव खंडेश्वर, अमरावती प्रतिनिधी विलास सावळे, २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन आरोग्य विशेष:
नांदगाव खंडेश्वर : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रशासन व जनता यांच्यातील दरी सांधण्यासाठी इकोनेट संस्थेच्या वतीने आयोजित ‘तालुका स्तरीय आरोग्य जनसंवाद’ कार्यक्रम १८ मार्च रोजी पदमपाणी मंगलम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मागील सहा महिन्यांपासून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील सेवांचा सखोल अभ्यास केल्यानंतर, या अभ्यासातील निष्कर्ष मांडण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनासमोर ठेवण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग करण्यात आला.
या कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे, सह गटविकास अधिकारी निलेश ठाकरे, इकोनेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौरीताई भोपटकर यांच्यासह आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात तालुक्यातील ओंकारखेडा, शिरपूर, धानोरा फसी, वडूरा, हिंगलाजपूर यांसह १० हून अधिक गावांमधून ३५० पेक्षा जास्त महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला. जनसंवाद सत्रात नागरिकांनी खालील महत्त्वाचे प्रश्न मांडले:
-
रुग्णवाहिका सेवा: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध होण्यातील अडचणी.
-
औषध उपलब्धता: आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा साठा नियमित असणे.
-
योजनांचा लाभ: जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ मिळवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी.
-
पायाभूत सुविधा: आरोग्य उपकेंद्रांमधील सोयीसुविधा आणि दळणवळणाच्या समस्या.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या धैर्याने पुढाकार घेऊन आरोग्य केंद्रांमधील आपल्या अनुभवांचे कथन केले.
नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांनी आश्वासन दिले की, “मांडण्यात आलेल्या अडचणींची गंभीर दखल घेतली जाईल. शासन स्तरावर पाठपुरावा करून औषध पुरवठा आणि रुग्णवाहिका सेवा अधिक सुरळीत केली जाईल. नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे.”
इकोनेट संस्थेचे राहुल साळवी, सुनीता देशमुख आणि त्यांच्या टीमने तालुक्यातील लोणी, मंगरूळ चव्हाळा, सातारगाव या केंद्रांचा अभ्यास करून तयार केलेला अहवाल सादर केला. अति जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रकल्प राबवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशासाठी रंजनाताई वानखडे, छायाताई जाधव, रेखा कराड, काजल पवार यांच्यासह इकोनेटच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


