उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी महापौरांचे कडक निर्देश; आयुक्तांना ‘समर अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे आदेश
प्रतीनिधी: पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: २९ मार्च २०२६, © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शहरातील उपलब्ध जलसाठा, भूजल पातळीतील घट आणि वाढती मागणी लक्षात घेता, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी महापौर रवि लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला सतर्क केले आहे. संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना तातडीने प्रभावी आणि सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
नागरिकांना नियमित, समतोल आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची वैधानिक जबाबदारी आहे. या जबाबदारीत कोणतीही कसूर राहू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करावे, असे महापौरांनी बजावले आहे.
महापौरांनी प्रशासनाला तातडीने ‘उन्हाळा पूर्व कृती आराखडा’ (Summer Action Plan) तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. या आराखड्यांतर्गत खालील बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे:
-
जलसाठा व वितरण: उपलब्ध धरण साठा, जलशुद्धीकरण केंद्रे आणि वितरण यंत्रणेचे सखोल परीक्षण करून सूक्ष्म नियोजन करणे.
-
गळती व चोरी रोखणे: मुख्य व उपजलवाहिन्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करणे, तसेच अनधिकृत नळजोडण्या आणि पाणीचोरीवर कडक कायदेशीर कारवाई करणे.
-
पर्यायी व्यवस्था: संभाव्य टंचाईग्रस्त भागांची यादी करून तिथे टँकर पुरवठा व्यवस्था सज्ज ठेवणे. तसेच सार्वजनिक बोअरवेल आणि विहिरी पुनरुज्जीवित करणे.
पाणीपुरवठ्याशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी सक्षम तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. याशिवाय पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर आणि अपव्यय टाळण्याबाबत शहरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
“उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध आणि परिणामकारक उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा ही मूलभूत गरज असून त्यामध्ये कोणतीही दिरंगाई किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करत नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळेल याची खात्री करावी.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड.
उन्हाळ्याच्या कालावधीत शहरात पाणीटंचाईचे सावट निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
