अकोला LCB ची मोठी कारवाई: मेघा इंजिनिअरिंगमधील ७.५० लाखांची कॉपर केबल चोरी १२ तासांत उघड; दोन आरोपींना बेड्या
अकोला / मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ३० मार्च २०२६, © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला: बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि. च्या गोदामातून झालेली लाखो रुपयांची कॉपर केबल चोरी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांत उघडकीस आणली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २८ मार्च २०२६ रोजी जलालाबाद (ता. बार्शीटाकळी) येथील मेघा इंजिनिअरिंगच्या सोलर प्लांट इन्स्टॉलेशन गोदामातून अज्ञात चोरट्याने ७० स्क्वेअर एमएमचा अर्थिंग केबल आणि ४ स्क्वेअर एमएमचा डीसी केबल असा एकूण ८,७५,०००/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा (अ.नं. २७०/२०२६) दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना तांत्रिक माहितीच्या आधारे गोदामात काम करणारा संशयित संदीप उमेश राय (वय २७, रा. सारीपूर, जि. बक्सार, बिहार) याने केबल विकल्याचे निष्पन्न झाले.

त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा चोरीचा माल शहेजाद बेग सलीम बेग (वय ३२, रा. बादशाह नगर, पातूर) याला विकल्याचे कबूल केले. पोलिसांनी तत्काळ पातूर येथून शहेजाद बेग याच्याकडून चोरीचा ७.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
-
७० स्क्वेअर एमएमचा अर्थिंग केबलचा मोठा ड्रम (किंमत ६,५०,०००/- रुपये)
-
४ स्क्वेअर एमएमचे डीसी केबलचे दोन पॅकिंग ड्रम (किंमत १,००,०००/- रुपये)
-
५ रिकामे ड्रम
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, पो.नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि गोपाल जाधव, दशरथ बोरकर, गणेश पांडे, गोकुळ चव्हाण, उमेश पराये, अन्सार शेख, स्वप्नील खेडकर, आकाश मानकर आणि मनीष ठाकरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि बाळू पवार (बार्शीटाकळी पोलीस स्टेशन) करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
