news
Home पिंपरी चिंचवड सांगवी-बोपोडी पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण! महापौरांच्या हस्ते सुशोभीकरण कामाचे लोकार्पण

सांगवी-बोपोडी पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण! महापौरांच्या हस्ते सुशोभीकरण कामाचे लोकार्पण

मुळा नदीवरील पुलाचा कायापालट; अत्याधुनिक विद्युत रोषणाईने उजळला सांगवी परिसर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘सरकार शितोळे सेतू’ नामकरण व सुशोभीकरणामुळे सांगवी–बोपोडी परिसराला नवी ओळख – महापौर रवि लांडगे

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ८ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: मुळा नदीवरील सांगवी–बोपोडी दरम्यान असलेल्या महत्त्वाच्या पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण करण्यात आले असून, या पुलावर करण्यात आलेल्या अत्याधुनिक विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरणामुळे परिसराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि आकर्षक वातावरणात प्रवासाचा अनुभव मिळणार असून शहराच्या विकासाला नवा आयाम प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या पुलाचे नामकरण, विद्युत रोषणाई व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमात बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, विद्यमान पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आणि त्यांना आधुनिक रूप देणे हे महापालिकेचे प्रमुख ध्येय आहे. ‘सरकार शितोळे सेतू’च्या सुशोभीकरणामुळे केवळ पुलाचा कायापालट झाला नाही, तर शहराच्या वैभवातही भर पडली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारे असे प्रकल्प भविष्यातही राबवले जातील.

या सोहळ्याला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. तसेच नगरसदस्य नवनाथ जगताप, हर्षल ढोरे, राजू बनसोडे, प्रभाकर वाघेरे, नगरसदस्या दीप्ती कांबळे, उज्ज्वला ढोरे, पल्लवी जगताप आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरकार शितोळे यांच्या कुटुंबातील नीलिमा नितीन शितोळे, नेहा शितोळे पवार, नकुलशिवराज शितोळे यांचीही विशेष उपस्थिती होती.

सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सांगवी–बोपोडी परिसरासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन पुलाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, यामुळे स्थानिक परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नमूद केले की, महापालिका शहरातील विद्यमान सुविधांच्या देखभालीवर आणि आधुनिकीकरणावर विशेष लक्ष देत आहे. अशा आकर्षक रोषणाईमुळे शहराचे रात्रीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते आणि प्रवाशांना सुखद अनुभव मिळतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!