वाकड–म्हातोबानगर परिसरात महापालिकेची धडक कारवाई; २४ मीटर रस्ते रुंदीकरणातील ४१ अतिक्रमणे जमीनदोस्त
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले दिनांक: ८ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने वाकड-म्हातोबानगर परिसरात मोठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. विकास आराखड्यात (DP) आरक्षित असलेल्या २४ मीटर रस्त्यावरील सुमारे १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे या कारवाईत निष्कासित करण्यात आली. रस्ता रुंदीकरणातील अडथळे दूर करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यामध्ये झोपडपट्टी निर्मूलन, स्थापत्य, शहरी दळणवळण, नगररचना, विद्युत आणि अतिक्रमण विभागासह अग्निशामक दल व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता आर. व्ही. शिंदे आणि चंद्रकांत मोरे यांच्या पथकाने प्रत्यक्ष उपस्थित राहून अतिक्रमणे हटवली.
शहराचा नियोजित आणि सुटसुटीत विकास साधण्यासाठी विकास आराखड्यातील आरक्षित जागा अतिक्रमणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. आरक्षित जागांवरील अतिक्रमणांमुळे भविष्यात पायाभूत प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांनी आरक्षित जागांवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, प्रमुख रस्ते सक्षम व सुरक्षित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. अशा मोहिमांमुळे शहराचे नियोजन अधिक पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने राबवता येते.
“शहराची वाढती लोकसंख्या, वाहतुकीचा ताण आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता रस्ते रूंदीकरण ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानाशी थेट संबंधित बाब आहे. शहर अधिक सुंदर आणि सुसज्ज करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असून, भविष्यातील सोयीसुविधांसाठी महापालिकेच्या रस्ता रूंदीकरण कारवाईस नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



