विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेरचा नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता विकसित करावी – रामहरी कुटे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “चौकटीबाहेरचा आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमताच आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रम किंवा परीक्षेपुरते मर्यादित न राहता, मिळवलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात वापर करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे,” असे प्रतिपादन स्कोडा ऑटो वोक्सवॅगन इंडिया प्रा. लि. कंपनीच्या कर्मचारी संबंध विभागाचे प्रमुख रामहरी कुटे यांनी केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने ‘व्यवस्थापनातील नाविन्यता आणि माहिती तंत्रज्ञान’ (Innovation in Management and IT) या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मलेशियाचे परदाना व म्हासा विद्यापीठ, नेपाळचे पोखरा विद्यापीठ, इंडो युरोपियन एज्युकेशन फाउंडेशन आणि मॉरिशसची मनुष्यबळ व्यवस्थापन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
रामहरी कुटे पुढे म्हणाले की, “आपल्याला सुचणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पनांची नोंद ठेवण्याची सवय लावून घ्या. सुचलेल्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. अपयश आले तरी खचून न जाता सातत्याने त्या कल्पनेचा ध्यास घेतल्यास यश निश्चित मिळते. वेगाने बदलणाऱ्या जगात तंत्रज्ञानातील बदलांबाबत विद्यार्थ्यांनी सदैव सजग राहायला हवे.”
यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी आपल्यातील संशोधकवृत्ती केवळ शोधनिबंध प्रसिद्ध करण्यापुरती मर्यादित ठेवू नये. वास्तव जगातील समस्या सोडवण्यासाठी आणि नवनिर्मितीसाठी या संशोधनाचा उपयोग व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”
-
शोधनिबंध पुस्तिका: या प्रसंगी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शोधनिबंध संक्षिप्त पुस्तिकेचे (Abstract Book) प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
-
सहभाग: परिषदेत देश-परदेशातील सुमारे १३० संशोधन प्रबंध सादर करण्यात आले.
-
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: पहिल्या दिवशी मॉरिशसच्या ला सेंटीनेले ग्रुपचे सीईओ आरिफ सालारू, एम्डॉक्सचे डॉ. रवींद्रपाल सिंग, टीसीएसचे मनोजकुमार चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांची व्याख्याने झाली.
-
गौरव: आयआयएमएसच्या एमबीए व एमसीए विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, आयटीएस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केदार खळदकर, कंबोडिया विद्यापीठातील प्रा. डॉ. शाद खान (ऑनलाईन) यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल गौड, अपर्णा मिसाळ, आज्ञा पाटील व प्रीती शेडोळे या विद्यार्थिनींनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



