news
Home अमरावती अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; अंगणवाडी भरती प्रक्रियेतील ‘राजकारणा’वर ॲड. कलाने यांचा प्रहार

अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; अंगणवाडी भरती प्रक्रियेतील ‘राजकारणा’वर ॲड. कलाने यांचा प्रहार

सुशिक्षित महिलेची नियुक्ती रोखणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी; पीडित मनीषा आमटे यांना न्याय मिळवून देण्यासाठी रणशिंग फुकले | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मनीषा आमटे यांना तात्काळ अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्ती द्या; अन्यथा उग्र आंदोलन करणार!

 

अमरावती प्रतिनिधी, विलास सावळे, १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर (काशी) येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ मध्ये मदतनीस पदासाठी गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर असूनही सौ. मनीषा मोहन आमटे यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. या प्रलंबित नियुक्तीसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि मनीषा आमटे यांना तात्काळ नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी मातंग अस्मिता संघर्ष सेना (Mass) महाराष्ट्र राज्य आक्रमक झाली आहे.

या संदर्भात मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे विदर्भ कार्यवाहक व विधी सल्लागार ॲड. राजूभाऊ मधुकरराव कलाने यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि अनुसूचित जाती आयोगाला निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

रिद्धपूर येथील अंगणवाडी मदतनीस पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेत मनीषा मोहन आमटे (लग्नापूर्वीचे नाव मनीषा खडसे) या गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय, मोर्शी यांनी २३ जुलै २०२५ रोजी जाहीर केलेल्या प्राथमिक यादीनुसार त्या पात्र ठरल्या आहेत. निवड समितीच्या निर्णयानुसारही त्या निवडीस पात्र असताना, काही विशिष्ट दबावाखाली त्यांना नियुक्तीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनाद्वारे खालील अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची आणि चौकशीची मागणी करण्यात आली आहे:

१. विलास मरसाळे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती)

२. सुजाता खुजे (महिला व बाल विकास योजना अधिकारी, मोर्शी)

३. कीर्ती तळेगावकर (विस्तार अधिकारी, सांख्यिकी, मोर्शी)

४. दरख्शा नाज सज्जाद अहेमद शेख (तत्कालीन सरपंच, रिद्धपूर)

एका सुशिक्षित आणि गरजू महिलेला विशिष्ट समाजाच्या किंवा जातीच्या दबावाखाली राहून जाणीवपूर्वक पदापासून लांब ठेवले जात आहे. यामुळे पीडित महिलेला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हा पदाचा दुरुपयोग असून प्रशासकीय शिस्तीचा भंग आहे, असे ॲड. कलाने यांनी निवेदनात म्हटले आहे.


प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ नियुक्तीचे आदेश न दिल्यास, पीडित महिलेचे कुटुंब आणि मातंग अस्मिता संघर्ष सेना संपूर्ण महाराष्ट्रात समविचारी संघटनांना सोबत घेऊन उग्र आंदोलन छेडणार आहे. या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामांना आणि कोणत्याही जीवितहानीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही ॲड. कलाने यांनी दिला आहे.

निवेदन देतेवेळी ॲड. राजूभाऊ कलाने, ॲड. प्रदीप वाघमारे, मनीषा आमटे, मोहन आमटे, निलेश खडसे (जिल्हाध्यक्ष, Mass) यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!