news
Home पिंपरी चिंचवड शहराच्या विद्रुपीकरणाला महापालिकेचा लगाम! किवळे-चिंचवडमध्ये बेकायदेशीर होर्डिंग्सवर चालला हातोडा

शहराच्या विद्रुपीकरणाला महापालिकेचा लगाम! किवळे-चिंचवडमध्ये बेकायदेशीर होर्डिंग्सवर चालला हातोडा

आकाशचिन्ह व परवाना विभागाची धडक कारवाई; नियम मोडणाऱ्या जाहिरात एजन्सींना कठोर इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विनापरवाना जाहिरात फलकांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हातोडा; किवळे आणि चिंचवडमधील अनधिकृत होर्डिंग्स निष्कासित

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , २४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील विविध भागांत विनापरवाना उभारण्यात आलेले तीन मोठे जाहिरात फलक निष्कासित केले आहेत.

शहरात जाहिरात फलक उभारण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि राज्य शासनाच्या ९ मे २०२२ च्या नियमावलीनुसार महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेच्या पथकाने खालील ठिकाणी धडक कारवाई करून अनधिकृत होर्डिंग्स हटवले:

  • किवळे: कातळेवस्ती, एन.डी.एस. बँक्वेट्स लॉन समोर उभारण्यात आलेले २० बाय २० आकाराचे दोन भव्य जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले.

  • चिंचवड: मोरया गोसावी मंदिरासमोर उभारण्यात आलेला १० बाय १० आकाराचा एक जाहिरात फलक हटवण्यात आला.

महापालिका हद्दीतील सर्व जाहिरात एजन्सी, व्यावसायिक आणि संबंधित घटकांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे कोणतेही विनापरवाना फलक उभारू नयेत. नियमांचे उल्लंघन केल्यास केवळ होर्डिंग्स हटवले जाणार नाहीत, तर संबंधित मालकांवर कायद्यानुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल.


“शहर नियोजन आणि नागरी शिस्त ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिक व व्यावसायिकांची सामूहिक जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवड शहर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि नियोजित ठेवण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शहराच्या सुव्यवस्थेसाठी ही कारवाई यापुढेही सुरूच राहील.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

“शहराचे सौंदर्य आणि नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी अनधिकृत जाहिरात फलकांना अजिबात थारा दिला जाणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली जाईल.”

– राजेश आगळे, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!